Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८

द्रोणाचार्याच्या भूमिकेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा

चंद्रपूर : पतंजलीच्या माध्यमातून रामदेव महाराज यांनी एखादे संशोधन केंद्र उभारावे. या परिसरातील शेतकरी एकलव्यांसारखा मेहनती असून या शेतकऱ्यांना द्रोणाचार्य बनून मार्गदर्शन करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर तालुक्यातील मुल येथे 20, 21 व 22 असे तीन दिवस बाबा रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

यावेळी दुपारच्या सत्रात आयोजित शेतकरी मेळाव्याला ते संबोधीत करताना योगगुरू बाबा रामदेव यांनी चंद्रपूर व विदर्भ परिसरातील शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता आता वनौषधी आणि दुग्ध उत्पादनाकडे वळावे. मला वनौषधींची गरज आहे. मी खरेदी करायला तयार आहे. त्यामुळे जे विकल्या जाते ते पिकवायला सुरूवात करून स्वत:ला व देशाला बळकट करण्याचे आवाहन केले.

मेळाव्याला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, माजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती.

यावेळी रामदेव महाराज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा देश ऋषी आणि कृषीचा आहे. त्यामुळे आज बदलत्या काळात देशाचा सन्मान आणि महत्त्व टिकवून ठेवायचे असेल तर काही बदल शेतीतही करणे गरजेचे आहे. मला माझे पुढचे आयुष्य शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी खर्च करायचे आहे. त्यामुळे आता जे काही मला विकायचे आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या शेतात घ्यायला सुरुवात करा. एका पिकावर आता शेतकऱ्यांचे भले होणार नाही. त्यामुळे जे विकायचे आहे, जे विकले जाणार आहे तेच पिकवायला शिका, असे आग्रही आवाहन त्यांनी केले.

नागपूरमधील मिहानमध्ये मोठ्या क्षमतेचे संत्रा प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. विदर्भातील एकही संत्र यामुळे वाया जाणार नाही. मात्र मी त्या ठिकाणी तयार केलेल्या प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात संत्र्याशिवाय अलवेरा, आवळा आदींची गरज आहे. शेतकऱ्यांच्या भरीव व आवश्यक उत्पादनाच्या माध्यमातून भारताला महासत्ता बनविण्याचा पतंजलीचा मानस असून पुढील काळात दुग्ध उत्पादनातही आमची कंपनी आपला वाटा वाढवणार आहे. त्यामुळे दुध मोठया संख्येने लागणार आहे. शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या जोड धंद्याला आपलेसे करावे, असेही आवाहन केले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थितांना संबोधीत करताना स्वत:च्या कर्तृत्वावर कोट्यवधीचा व्यवसाय करुन दाखवणाऱ्या रामदेव महाराज यांनी त्यांच्या या कौशल्‍याचे ज्ञान गरीब शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.