मुंबई /प्रतिनिधी– मोदींना कोणताही अपशकून करायचा नाही असं घोषित करत गुजरात निवडणुकीपासून लांब राहिलेल्या शिवसेनेनं अचानक विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई, राजुल पटेल आणि हेमराज शहा हे आज गुजरातला रवाना होता आहेत. गुजरातमध्ये आज ते संध्याकाळी उशीरा पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.
सुरत आणि बडोदा या मराठीबहुल भागात उमेदवार उभे करण्याचे संकेत शिवसेनेनं दिलेत. साधारणपणे 40 जागांवर शिवसेना उमेदवार देईल अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. तसंच हार्दिक पटेल यांनी काँगेससोबत हातमिळणी करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र ज्या पाटीदारांना काँग्रेसचा पर्याय मान्य नाही. ते शिवसेनाला जवळ करु शकतात.
यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपसमोर कडवं आव्हान निर्माण झालं आहे. तेही मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. त्यामुळे भाजपसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणूकीकडं पाहिलं जातंय. यंदा पहिल्यांदाच हिंदुत्ववादाच्या ऐवजी जातीपातीच्या पातळीवर ही निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे भाजपची आधीच अडचण झाली आहे. त्यात आता शिवसेनेनं भाजपाल डिवचण्यासाठी अचानक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.