अकोला/प्रतिनिधी: बिअरशॉपीच्या परवाण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपा उपायुक्तांना स्वीयसहायकासह अटक करण्यात आली.
३० वर्षीय फिर्यादी यांचे हॉटेल आहे. त्यांनी बिअरशॉपीच्या शॉपॲक्टसाठी मनपाकडे अर्ज केला. या अर्जाच्या परवानगीसाठी मनपा उपायुक्त (प्रशासन व विकास) समाधान चांगो सोळंके यांच्याकडे आला. अर्जदाराला बुधवारी दुपारी समाधान सोळंके यांनी त्याच्या कक्षात बोलावून स्वीयसहायक राजेश रामदास जाधव (४३) यांच्यातर्फे २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे फिर्यादींनी ठरविले. स्वीयसहायक राजेश जाधव व त्याचे दोन साथीदार हे रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता व पैसे घेण्याकरिता गेले. फिर्यादीने त्यांना २० हजार रुपये दिल्याबरोबर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राजेश जाधव यास पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या अटकेनंतर त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याचे सांगितल्यानंतर एसीबीने सोळंके यांना रामनगरमधील म्हाडा कॉलनीतील बंगला नं. दहा मधून अटक केली. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एसीबीकडून या दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.