Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै ०२, २०१४

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

सोयाबीनचा मोडा : कपाशी जमिनीतच करपण्याची शक्यता
चंद्रपूर: जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पाण्याअभावी साडेचार लाख हेक्टर शेती यंदा धोक्याच्या उंबरठय़ावर आहेत. मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळाने कोलमडून गेलेला शेतकरी यंदा कोरड्या दुष्काळाने होरपळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात केवळ १४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मृग नक्षत्रात केवळ दोनदा झालेल्या मोठय़ा पावसाने आनंदीत झालेल्या शेतकर्‍यांनी शेतात पेरणी केली खरी; पण त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्याने जमिनीतील बियाणे जमिनीतच करपून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत पाऊस न आल्यास १४ टक्के पेरणी वाया जाऊन शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षी अतवृष्टीमुळे खरीप हंगामात चारदा पेरणी करूनही शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यातून कसेबसे सावरलेल्या शेतकर्‍यांनी कर्ज काढून रब्बी हंगामाची तयारी केली. त्या भरवशावर खरीपाचे कर्ज फेडण्याचा विचार करणार्‍या शेतकर्‍यांना रब्बी हंगामातही निसर्गाने फटका दिला. पीक हाती येण्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिके उद्वस्थ झाली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यंदा सामान्य पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने सुरूवातीला वर्तविला होता. मात्र मृग नक्षत्रानंतर पावसाचे २३ दिवस मागे पडूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. परिणामी जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. केवळ १४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. उर्वरित शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक धान असले तरी कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. २१ जूनला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकर्‍यांनी शेतात कपाशीची टोबणी केली. त्यानंतर आठवडाभर पाऊसच आला नाही. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होऊन जमिनीतील ९0 टक्के बियाणे फुगून मृत झाले. त्यानंतर आलेल्या पावसाने उर्वरित बियाणांना अंकुर फुटला. मात्र पुन्हा पावसाने 'दांडी' मारल्यामुळे हे अंकुर करपून जाण्याची भीती आहे.
सोयाबिन पिकाचीही तिच अवस्था आहे. पावसाअभावी सोयाबीनला मोडा आला आहे. हजारो रुपये खर्च करून बियाणे खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांना त्यामुळे मोठा फटका बसणार आहे. काही शेतकरी पीक वाचविण्यासाठी हाताने रोपट्यांना पाणी देत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.