Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०४, २०१०

चंद्रपूर > विशेष

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने व कार्याने पावन झालेली आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदवन’चे अविरत सेवाकार्य जेथे सुरू आहे अशी भूमी म्हणजेच चंद्रपूर जिल्हा!
ताडोबा राष्ट्रीय उद्यान, औष्णिक विद्यूत निर्मिती केंद्र, देशातील प्रमुख कागद कारखाना, खनिजदृष्ट्या समृद्धी, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक असलेले वनक्षेत्र ह्या विविध वैशिष्ट्यांनी विदर्भ भागातील हा चंद्रपूर जिल्हा नटलेला आहे.

--------------------------------------------------------------------------------

ऐतिहासिक महत्त्वाचे
प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.
साधारणतः नवव्या शतकात या प्रदेशावर प्रथम नागवंशीय राजांची व त्यानंतर गोंड राजांची सत्ता होती असे लिखित इतिहासात आढळते. नागवंशीय बौद्ध राजा गहलू याने भद्रावतीपासून ८०कि.मी. अंतरावर माणिकगड हा किल्ला बांधला असे म्हणतात. पुढे अठराव्या शतकाच्या आसपास या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. नागपूरच्या भोसले घराण्यातील राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याचे कारण दाखवून हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यास जोडला गेला.

भूगोल
जिल्ह्याचे भौगोलिक स्थान -
जिल्ह्याच्या उत्तरेस - भंडारा व नागपूर जिल्हा, दक्षिणेस - अदिलाबाद जिल्हा (आंध्रप्रदेश), पूर्वेस - गडचिरोली जिल्हा, पश्चिमेस - यवतमाळ जिल्हा- हे जिल्हे वसलेले आहेत.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भात चंद्रपूर जिल्हा आहे. २६ ऑगस्ट, १९८२ पर्यंत चंद्रपूर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा तर भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा होता. याच दिवशी या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले व चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची
निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याच्या नैऋत्य कोपर्‍यात डोंगर पसरलेले आहेत. उर्वरित जिल्हा मंद उताराचा असून अधूनमधून डोंगररांगा व टेकड्या आहेत. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे मूल-चिमूर टेकड्यांचा प्रदेश, वर्धा-वैनगंगा खोर्‍याचा प्रदेश व चांदूरगडचा डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग पडतात.
लोकसख्या - (संदर्भ - जनगणना २००१)
क्र तपशील              संख्या
१ क्षेत्रफळ               ११,४४३ चौ. कि. मी.
२ लोकसंख्या एकूण २०,७१,१०१
२.१ पुरुष                  १०,६२,९९३
२.२ स्त्रिया                १०,०८,१०८
२.३ ग्रामीण             १४,०६,०३४
२.४ शहरी                ६,६५,०६७
३ स्त्री- पुरुष गुणोत्तर   १०००:९४८
४ साक्षरता एकूण      ७३.१७%
४.१ पुरुष                     ८२.९४ %
४.२ स्त्री                        ६२.८९ %
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासी जमातींची आहे. त्यामुळे हा जिल्हा ‘आदिवासी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. येथील दाट जंगलांच्या व डोंगराळ भागात कोळंब (कोलाम) जमातीचे लोक  रहातात. परधान या जमातीचे लोकही काही प्रमाणात येथे आढळतात. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या ‘माडिया गोंड’ या आदिवासी
जमातीचे लोकही या जिल्ह्यात आढळतात

वनक्षेत्र -
चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक
भाग जंगलांनी व्यापला आहे. वनांचा विचार करता गडचिरोली व नंदुरबार या
जिल्ह्यांनंतर चंद्रपूर हा राज्यात तिसर्‍या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा ठरतो. विविध प्रकारच्या वन उत्पादनांनी समृद्ध असा हा जिल्हा आहे. उत्तम प्रकारचे सागवान, तेंदूची पाने, बांबू, मोहाची फुले ही येथील प्रमुख वनउत्पादने आहेत. चिरोल आणि नवेगाव टेकड्यांवर असलेला परिसर आलापल्ली अरण्य’ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे.

समृद्ध खनिजसंपत्ती -
महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो. राज्यातील तांब्याचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यामध्ये आहेत. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपूर तालुक्यात घुगुस व बल्लारपूर; राजुरा तालुक्यात साष्टी; भद्रावती तालुक्यात माजरी आणि वरोरा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, व असोला (गुंजेवाही) येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहार डोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात मुख्यतः वरोरा तालुक्यात चुनखडक सापडतो. तसेच राजुरा तालुक्यातही बर्‍याच भागांत चुनखडकाचे पट्टे आहेत. तसेच ग्रॅनाइट, वालुकाश्म, जांभा यांसारखी खनिजे व खडकही जिल्ह्यातील काही भागांत आढळतात.

प्रमुख नद्या, धरणे आणि तलाव -
बारमाही पाणी असलेली वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पुढे ही नदी पैनगंगा व वैनगंगा या दोन नद्यांना जाऊन मिळते. इरई ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर मूल ही वैनगंगेची महत्त्वाची उपनदी आहे. राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई नदीकाठी वसले आहे. जिल्ह्यात मोठी धरणे फारशी नाहीत. सिंदेवाही तालुक्यात असोलमेंढा येथे, नागभीड तालुक्यात नळेश्वर व घोडेझरी येथे तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे काही धरणे आहेत.  महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होतो. या जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा असोला  तलाव  आहे. तसेच घोडेझरी तलावही आहेत.

प्रशासन
चंद्रपूर तालुक्यातील १४+१ तालुक्यांची सूची पुढे दिली आहे.
क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ वरोरा ८८९.६ १६५,८४३
२ चिमुर ९५७.० १५६.७७२
३ नागभिर ५१८.० १२४,४२५
४ ब्रह्मपुरी ५९३.९ १५३,४८६
५ सावली ४९४.० १०४,६८६
६ सिंदेवाही ३७४.० १०६,२७५
७ भद्रावती ७८४.० १५६,९९५
८ चंद्रपूर ५७६.० ४४०,८९७
९ मूल ४८६.२ ११०,१०९
१० पोंभूर्णा २७२.० ४७,९०६
११ बल्लारपूर २०९.५ १३३.७२२
१२ कोरपना ८२९.१ १४३,२१०
१३ राजुरा १,०७७.८ १५२,२१६
१४ गोंडपिंपरी ४४३.० ७४,५५९
मे, २००२ मध्ये जिवती हा तालुका अस्तित्वात आला आहे. सध्या चंद्रपूर जिल्हा १५ तालुक्यांचा मिळून बनला आहे.
--------------------------------------------------------------------------------

क्र तपशील संख्या नावे
१ नगरपालिका ७ चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, मूल, ब्रह्मपुरी, वरोरा
२ जिल्हा परिषद १ चंद्रपूर
३ पंचायत समित्या १४ राजुरा, चंद्रपूर, वरोरा, नागभीड, सिंदेवाही, मूल, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, सावली, गोंडपिंपरी, पोंभूर्णा एकूण १४७२ लोकवस्ती असलेल्या गावांपैकी ८४८ गावांमध्ये ग्रामपंचायती आहेत.
--------------------------------------------------------------------------------
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ (२) :
१. चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, अर्णी हे विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.
२. गडचिरोली - चिमूर - ब्रम्हपुरी व चिमुर चंद्रपूर हे दोन विधानसभा
मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले आहेत.
विधानसभा मतदारसंघ (६) : राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा असे आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे ५७ मतदारसंघ असून पंचायत समितीचे ११४मतदारसंघ आहेत.
--------------------------------------------------------------------------------
शेती
जिल्ह्याचे ‘भात’ हे प्रमुख पीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्‍यात कापूस पिकवला जातो. याशिवाय तीळाची लागवडही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण हे १२१४ मि.मी. इतके आहे.
उद्योग :
चंद्रपूर औष्णिक केंद्र (चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन -CSTPS) हे देशातील सर्वांत मोठे केंद्र आहे. याची उर्जा निर्मितीची क्षमता २३४० मेगावॅट इतकी आहे. राज्यातील २५% उर्जेचे उत्पादन येथे होते. ग्रीनटेक पारितोषिक मिळवणारे हे देशातील पहिले केंद्र आहे. जगातल्या १०० सर्वात मोठ्या कागद उत्पादन करणार्‍या कारखान्यांपैकी एक
भारतातील सर्वात मोठा असा बल्लारपूर इंडस्ट्रीज (बील्ट) या नावाने ओळखला जाणारा कागद कारखाना याच जिल्ह्यात आहे. सिमेंट उद्योगासाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध असून, हा राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात दगडी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे येथे दगडी कोळशाच्या आधारे औष्णिक विद्युत निर्माण करतात. चंद्रपूर व  भद्रावती येथे चिनी भांडी तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. याचबरोबर भद्रावती येथे युद्धनिर्मिती साहित्याचा कारखाना आहे. भातगिरण्या हा देखील जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. नागभीड व सावली येथे कोशाच्या कापडाचा उद्योग विकसित होतो आहे येथील सुरया देखील प्रसिद्ध आहेत. तसेच नागभीड तालुक्यातील विसापूर येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे. राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे प्रस्तावित आहे. वरोरा येथे पी. व्ही. सी. पाईप व रेफ्रीजरेटर (फ्रीज) यांची निर्मिती केली जाते. याशिवाय जिल्ह्यात चंद्रपूर, घुगुस व मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत.
-------------------------------------------------------------------------------
दळणवळण
नागभीड, तडळी व मांजरी ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
चंद्रपूरचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई ९५०
नागपूर १५२
औरंगाबाद ५३२
रत्नागिरी ९६८
पुणे ७५८
-------------------------------------------------------------------------------
पर्यटन
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) - ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले. हे वाघ संरक्षित क्षेत्र आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. या उद्यानात मोर, धनेश, गरूड, नीळकंठ, चंडोल, सुगरणी इत्यादी साधारण २५० प्रकारचे पक्षी आहेत. तसेच वाघ, सांबर, नीलगाय, गवा, अस्वल, चितळ, भेकर असे अनेक वन्यप्राणी आहेत. याशिवाय ताडोबातले ‘मगरपालन केंद्र’ आशिया खंडातले एक महत्त्वाचे व उत्तम मगरपालन केंद्र आहे. येथील ताडोबा सरोवराचा परिसर अतिशय रमणीय आहे. संध्याकाळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येथे येतात. या सरोवराशिवाय अनेक लहान-लहान पाणवठे येथे आहेत. उद्यानात एका सुंदर झोपडीत वन्य प्राण्यांचे संग्रहालय आहे. संग्रहालयात अस्वल, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचे सांगाडे आहेत. पक्ष्यांनी विणलेली सुंदर घरटी ठेवलेली आहेत.
अनेक पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे येथे आहेत. पाखरे व वन्यप्राणी यांचा मुक्त संचार असलेले आणि हिरव्या झाडांच्या सौंदर्याने बहरलेले हे ताडोबाचे उद्यान स्थानिक पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचेही आकर्षण ठरले आहे.
चंद्रपूर - एक ऐतिहासिक शहर अशी चंद्रपूर शहराची ओळख करून देता येईल. येथील गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. गोंड राजा ‘खांडक्या बल्लरशहा’ याने हा किल्ला बांधला असे म्हणतात. तसेच येथे असलेले महाकाली व  अचलेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. अलीकडे हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे.
नागभीड - नागभीडजवळील सर्व परिसर अतिशय निसर्गसमृद्ध आहे. येथील सातबहिनी, मुक्ताबाई व महादेव टेकड्यांवरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. येथे जवळच घोडेझरी हा तलाव आहे. तलावाच्या शेजारीच पूर्वी तलावात सापडलेल्या घोड्याचे मंदिरही आहे.  बल्लारपूर - गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. वर्धा नदीच्या काठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा खांडक्या बल्लर शाह यास दिले जाते. किल्ल्यातील राणीमहाल हा प्रेक्षणीय मानला जातो. भद्रावती - येथील भद्रनाथ मंदिर व पार्श्वनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. येथून जवळ असलेल्या विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.  सोमनाथ - सोमनाथ हे मूल तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असून येथे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटेप्रणीत प्रकल्प येथे ही कार्यरत आहे.
सामाजिक / विविध
राजुरा व गोंडपिंपरी, मूल व चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे. ही  योजना राबवताना जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, तेथील जीवनपद्धती, आर्थिक व सामाजिक मागासलेपण या बाबींचा प्रकर्षाने विचार केला आहे. जिल्ह्यातील नक्षलवादाचा प्रभाव वाढत असताना आर्थिक व सामाजिक न्यायाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या मार्गाने उत्तर देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणून या योजनेकडे पाहता येईल.
मार्च-एप्रिल च्या काळात चंद्रपूर येथे महाकाली मंदिराची यात्रा प्रसिद्ध आहे. घोडा जत्रा ही बालाजी मंदिराची जत्रा चिमूर येथे जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भरते.
वरोरा येथील आनंदवन - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. याच ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे व त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचे सेवाकार्य गेली ५७ वर्षे चालू आहे. बाबा आमट्यांनी जून १९५१ मध्ये महारोगी सेवा समितीच्या वतीने कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘आनंदवन’ ह्या प्रकल्पाची स्थापना केली. आणि आता या कार्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि सून डॉ.भारती आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या आदर्श सेवाकार्याची जागतिक  पातळीवर आवर्जून नोंद घेतली जाते.

शिक्षण:
चंद्रपूर जिल्हा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. जिल्ह्यामधे सुमारे ६१ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात ‘सिंदेवाही’ येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.
चंद्रपूर येथे सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स महाविद्यालय कार्यरत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयात वनउत्पादने (लाकूड वगळता), वन संरक्षण, वन-धोरण, वन्य प्राण्यांचे जीवन व वन व्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अलीकडच्या काळात महिलाही येथे प्रशिक्षण घेऊन वनाधिकारी बनत आहेत.
--------------------------------------------------------------------------------
विशेष व्यक्ती
दादासाहेब कन्नमवार - यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली गेली आणि नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.
आमटे कुटुंबीयांची (बाबा, डॉ. विकास, डॉ. भारती) कर्मभूमी असे या जिल्ह्याला म्हणता येईल. सामाजिक सेवा प्रकल्प उभे करून आमटे परिवाराने (विशेषत: बाबांनी) चंद्रपूरचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले.

चंद्रपूर हा विदर्भामधील एक जिल्हा आहे. पूर्वी चांदा म्हणूनही हा जिल्हा ओळखला जात असे. वर्धा नावाची नदी या जिल्ह्यामध्ये साधारण उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. चंद्रपूरच्या दक्षिणेकडे बल्लारपूर स्टेशन आहे. तसेच बल्लारपूर गाडीमार्गानेही उत्तमपैकी जोडले गेले आहे.
चंद्रपूरकडून राजूरा अथवा अलापल्लीकडे जाणारा गाडीरस्ता बल्लारपूरमधून जातो. वर्धा नदीच्या काठावर वसलेले बल्लारपूर शहर कोळसा खाणीमुळेही प्रसिद्ध आहे. इतिहास प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूर मधे वर्धा नदीच्या काठावर भुईकोट प्रकारचा किल्ला आहे.
शहरामधील वस्तीच्या एका बाजुला असलेला किल्ला मुख्य रस्त्यापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेश पूर्व दिशेला आहे. प्रवेशद्वारापासून जवळच केशवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेली पण मूळ शिशाची असलेली केशवनाथाची मुर्ती होती. इ. स. १८१८ च्या वेळी झालेल्या युद्धाच्या धामधुमीमध्ये ही मुर्ती चोरीला गेली. तेव्हा भोसल्यांनी तेथे नेमलेल्या कमाविसदार पुंजपाटील मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करुन नवीन दगडी मुर्ती बसवली.
बल्लारपूर किल्ल्याच्या पहिल्या दारातून आत शिरल्यावर दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजावर कमळ तसेच सिंहांची शिल्पे आहेत. या दरवाजामधून आत गेल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या मार्गाने दरवाजाच्या वरही जाता येते. येथील तटबंदीचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे.
साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्यामधील मुख्य वाड्याची वास्तू इंग्रजांनी पाडून टाकली असल्यामुळे हा भाग मातीच्या ढिगार्‍यामधे लुप्त झाला होता. तोही सध्या साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ढिगार्‍यामधे काही तळघरे दिसतात. तसेच नदीकाठाकडील बांधकाम सुस्थितीमधे असून नदीकडे जाणार्‍या दरवाजात पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांनी नदीच्या पात्रापर्यंत जाता येते. या बाजुने तटबंदीची भक्कम बांधणी पहायला मिळते.
बल्लारपूरच्या किल्ल्याला तीन बाजुंना प्रवेश मार्ग आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्याचे अवशेष, तळघरे, भुयारे, तसेच निरीक्षणासाठी सज्जा अशा वास्तू पहायला मिळतात.
बल्लारपूरचा किल्ला आदिया उर्फ अंड्या बल्लाळसिंह या गौड राजाने बांधला. त्याने शिरपूरवरुन आपली राजधानी बल्लारपूर येथे आणल्याचा इतिहास आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.