Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे २३, २०१०

पंधरा दिवसांत अतिक्रमण काढण्याची नोटीस


Wednesday, May 19, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: encroachment, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - "शहर एक आणि तापमानाच्या नोंदी अनेक' होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच नागपूर येथील भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरातील हवामापी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सभोवताल असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असून, 15 दिवसांचा अवधी दिल्याची माहिती डी. के. उके यांनी दिली.

एकाच शहरात घेतलेल्या किमान किंवा कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसचा फरक राहू शकत नाही. असे असतानादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ, रेल्वे खाते, खासगी संस्थांनी घेतलेल्या तापमान नोंदीत दोन अंशाचा फरक दिसून येत आहे. यावर "सकाळ'ने प्रकाश टाकल्यानंतर भारतीय हवामान खात्याचे नागपूर येथील अधिकारी डी. के. उके, एम. एल. टोके यांनी शहरातील हवामापीची पाहणी केली.

चंद्रपूर शहरातील तापमान, पावसाच्या नोंदी घेण्यासाठी तुकूम परिसरात इंग्रजकालीन हवामापी आहे. त्यावर भारतीय हवामान खात्याचे नागपूर केंद्र नियंत्रण ठेवत असते. पूर्वी ही जागा अडीच एकर होती. मात्र, अतिक्रमणामुळे या परिसरात इमारती झाल्याने केवळ अर्धा एकरच जागा शिल्लक राहिली आहे. या अतिक्रमणामुळे तापमानाच्या नोंदीत फरक पडू लागला आहे. हे सर्व अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना चारदा नोटीस देण्यात आली. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही. 1988 मध्ये हे अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी विरोध केल्याने अतिक्रमण वाढतच गेले. आता पुन्हा नोटीस बजावण्यात आली असून, 15 दिवसांचा अवधी देण्यात आल्याचे श्री. उके यांनी सांगितले. अतिक्रमण हटविण्याची कारवाई तहसीलदारांमार्फत करण्यात येणार असून, पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येईल, असेही उके यांनी स्पष्ट केले. या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय भवनातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवामापीची पाहणी केली. ही हवामापी इमारतीवर असून, जमिनीपासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे तिथे सूर्याची किरणे सरळ येत असल्याने तापमान जास्त दाखविते. नियमानुसार, हवामापी ही जमिनीपासून फक्त साडेचार फूट अंतरावर असायला पाहिजे. हवेचे तापमान, आर्द्रता, दिशा, गती, दाब आणि पाऊस यांची मोजणी केल्यानंतर त्या परिसराचे तापमान निश्‍चित होते, अशी माहिती हवामान खात्याचे एम. एल. टोके यांनी सांगितले.

सहा महिन्यांत स्वयंचलित हवामापी केंद्र
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर शहरात स्वयंचलित हवामाप केंद्र (ऍटोमेटिक वेदर स्टेशन) येत्या सहा महिन्यांत उभारण्यात येणार आहे. येथे प्रयोगशाळा, प्रशिक्षित कर्मचारी, वाहनांचा प्रस्ताव आहे. या स्वयंचलित केंद्रातून हवामान, तापमान, वर्षामापी करण्यात येईल.

हवामापी केंद्र स्थलांतराचा प्रस्ताव तुकूम येथील हवामापी केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यातून प्रशासनाने मुक्त करून न दिल्यास पर्याय म्हणून स्थलांतर करण्याची मागणी भारतीय मौसम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोरील बाबूपेठ येथील शीट क्र. 31, ब्लॉक क्र. 13 भू-काट क्र. 16 ही जागा हवामान केंद्रासाठी उपयुक्त असल्याचेही मौसम विभागाचे म्हणणे आहे. ही जागा वेधशाळेला हस्तांतरित करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
पोलिस अधीक्षकांनी मागितली माफी
खापरखेड्याच्या विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग
चंद्रपुरात रिमझिम पाऊस
दुष्काळाच्या छायेत नाट्य"रंग' हरविले
बिबट्याने दिला दोन बछड्यांना जन्म

प्रतिक्रिया
On 5/19/2010 10:31 AM Deepak BAdgujar said:
आता पुन्हा नगरभक्षक येतील आणि बांधकाम थांबवतील. परत येरे माझ्या मागल्या, काम करायचे नसेल तर फक्त कारण सांगितले कि झाले. वाट लावली आहे सर्वांनी या शहराची।




चंद्रपूर - अठरा किलोमीटर परिघाच्या आत एकाच दिवशी घेतलेल्या किमान किंवा कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसचा फरक राहूच शकत नसताना चंद्रपुरात मात्र भारतीय हवामान खाते, अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच रेल्वे विभागाकडून घेण्यात येणाऱ्या तापमानात दोन किंवा त्याहून अधिक अंश सेल्सिअसचा फरक राहात असल्याने शहराचे अधिकृत तापमानच नोंदले जात नसल्याची माहिती पुढे आली आहे.

देशभरात इंग्रज राजवटीने तापमानाची नोंद घेण्यात सुरवात केली. यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातच देशभरातील प्रमुख शहरांत वेधशाळा उभारण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या वेधशाळेमार्फत संकलित माहितीच्या आधारे भारतीय हवामान खाते विविध अंदाज वर्तवीत आहे. जिल्हास्तरावर भारतीय हवामान खात्याकडून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून ही आकडेवारी गोळा केली जाते, तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संकलित केलेली माहिती दररोज भारतीय हवामान खात्याकडे पाठविली जाते. चंद्रपूर शहरात तुकूम येथे वेधशाळा असून, ती इंग्रजकालीन आहे. मात्र, अलीकडे या केंद्रावरील तापमानाची नोंद आणि इतर शासकीय यंत्रणांकडून घेतले जाणारे तापमान यात बरीच तफावत आहे. नियमानुसार भारतीय हवामान खाते हीच तापमान नोंदविणारी यंत्रणा असून, त्यांचीच आकडेवारी अधिकृत समजली जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय, सिंदवाही येथील भात संशोधन केंद्र तसेच रेल्वे मंडळाकडून नोंदविण्यात येणारे तापमान आणि वेधशाळेकडून नोंदविण्यात येणारे तापमान यात बरीच तफावत असते. हवामान खात्याच्याच निकषानुसार अठरा किलोमीटरच्या आत वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच दिवशी घेतलेल्या तापमानात दोन अंश सेल्सिअसचा कधीच फरक राहू शकत नाही. त्यामुळे चंद्रपुरातील दररोज नोंदविण्यात येणाऱ्या तापमानापैकी अधिकृत आकडेवारी कुणाची, असा गंभीर प्रश्‍न समोर आला आहे.

शास्त्रीय निकषानुसार तापमान घेण्याच्या ठिकाणाच्या अवतीभवती शंभर मीटरपर्यंत झाडे नसावी, हवा खेळती असावी, आजूबाजूला उंच इमारती नसाव्यात तसेच अवतीभवती जलाशय किंवा गटारे नसावीत. तुकूम येथील इंग्रजकालीन केंद्राभोवती आता दाट वस्ती असून, वेधशाळेभोवती झाडेझुडपे आणि गटारे आहेत. त्यामुळे या केंद्रावर नोंदले जाणारे तापमान अधिकृत असूच शकत नाही, असा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा दावा आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.