चंद्रपूर:
जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत शिक्षणाधिकारी (मांध्य.) जि.प. चंद्रपूर यांच्या कार्यालयात आमदार तथा विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेपासून बैठा सत्याग्रह विमाशि संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ २४ मे २०२३ राेजी सहविचार सभा घेण्यात आली होती. त्यात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आलेले नाही. याबाबत त्यांना वारंवार सांगूनही टाळाटाळ केली जात आहे. जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली निघत नसल्याने शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याप्रती तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांसह बैठा सत्याग्रह करीत असल्याबाबतचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक (माध्य.) पूणे, शिक्षण उपसंचालक, नागपूर तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सादर केलेले आहे.
आयुक्तांकडे निवेदन पोहोचताच त्यांनी तात्काळ दखल घेत शिक्षण उपसंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावर शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षण उपसंचालकांनी आमदार सुधाकर अडबाले यांना सत्याग्रह मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आमदार अडबाले यांनी बैठा सत्याग्रह कोणत्याही परिस्थितीत मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण विभाग धास्तावून सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या मागे लागले अाहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ होणाऱ्या बैठा सत्याग्रहात शिक्षक-शिक्षकेत्तर तथा समस्याग्रस्त शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महा. राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, उपाध्यक्ष सुनील शेरकी, नामदेव ठेंगणे, गंगाधर कुनघाडकर, मंजुषा धाईत, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंटीवार, शालीक ढोरे, नितीन जीवतोडे, सोनाली दांडेकर, वसुधा रायपुरे, दिपक धोपटे, मारोतराव अतकरे, अध्यक्ष (ग्रामीण) सतीश अवताडे, कार्यवाह (ग्रामीण) अनिल देरकर, मुकेश खोके, बशीर सर, प्रशांत कष्टी, शरद डांगे, शहर अध्यक्ष जयंत टोंगे, शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, देवेंद्र बलकी, बंडूजी वांढरे, दादाराव श्रीरामे, शकील सर, रवि येसांबरे, प्रभाकर ढवस व सर्व सदस्यांनी केले आहे.