नागपूर,दि. 4 : जिल्ह्यातील मौदा उपविभागातील मौदा व कामठी तालुक्यातील गावातील 145 पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमून्यातील ऑनलाईन अर्ज 17 मे पर्यंत मागविण्यात आले आहे. (Police Patil Bharti 2023)
सरळ भर्ती प्रक्रियेत अनुसूचित जाती-25, अनुसूचित जमाती-13, विशेष मागास प्रवर्ग-4 विमुक्त जाती व भटक्या जमाती-21, इतर मागास प्रवर्ग-33 आणि खुल्या प्रवर्गासाठी 34, आर्थिक दुर्बल घटक-15 असे एकूण 145 पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज www.sdomoudaapp.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. या प्रक्रियेत 30 टक्के पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 17 मे 2023 पर्यंत आहे.
पोलीस पाटील पदासाठी आवश्यक अर्हता व अटीशर्ती या प्रमाणे आहे. अर्जदार दहावी परीक्षा पास असावा. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. रहिवासी दाखला मुलाखतीच्या वेळी सादर करावा. नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील. या परीक्षेसाठी आरक्षित व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी शुल्क 200 रुपये असून खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. पोलीस पदासाठी लेखी परीक्षेसाठी 80 गुण असून तोंडी परीक्षेसाठी 20 गुण असे 100 गुण राहील.
अर्जदार संबंधित एकाच गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असावा. अर्जदाराने एका गावासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जस्त गावातून केलेले सर्व अर्ज बाद ठरविण्यात येतील. पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर काम करावे लागत असल्याने पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. संपूर्ण भरती प्रक्रीयेदरम्यान पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना ऑनलाईन पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल सुस्थितीत ठेवावा. पात्र उमेदवाराला वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.sdomoudaapp.in या संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांकानंतर संकेतस्थावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मौदा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.