Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ३०, २०२३

कृउबा समिती निवडणुकीतील यश म्हणजे परिवर्तनाची नांदी - माजी मंत्री वडेट्टीवार




ब्रम्हपुरी : (APMC Election) काल जिल्ह्यातील नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर झाले. यात काँग्रेसने सात बाजार समित्यांवर घवघवीत यश संपादन केले असून दोन बाजार समिती वगळता उर्वरित पाच बाजार समित्यांवर काँग्रेसची आघाडी स्पष्ट आहे. सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीत मतदाराने दिलेला कौल व त्यातून मिळालेले यश हे परिवर्तनाची नांदी असल्याचे मत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ते जिल्ह्यातील बाजार समिती यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालावर प्रतिक्रिया पर बोलत होते. (vijay Wadettiwar)




चंद्रपूर जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांच्या निवडणुका लागताच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली. यात ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय प्रतिष्ठेची व चुरशीचा सामना पहावयास मिळाला. माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील या दोन्ही बाजार समित्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेत भाजपा ला शह देण्यासाठी चालविलेली युक्ती याचे फलित म्हणून दोन्ही बाजार समित्यांवर काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश मिळाले. सोबतच मुल येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वात १७ संचालकांचा विजय तर राजुरा विधानसभा क्षेत्रातील आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात येथे काँग्रेसचे १३ संचालक निवडून येताच मुल व कोरपना बाजार समितीवर काँग्रेसचा एक हाती झेंडा फडकविण्यात यश प्राप्त झाले आहे. #VijayWadettiwar #Congress


 
तर चंद्रपूर, राजुरा, येथे एक हाती सत्ता मिळाली नसली तरी सत्ता स्थापनेत मात्र काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. सोबतच नागपूर अमरावती व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांमध्ये भाजपाला माघारी टाकत बहुतांश ठिकाणी घवघवीत यश संपादन केले असून काँग्रेस सह महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांच्या वज्रमुठी पुढे भाजपाला पीछेहाट करावी लागली. तद्वतच सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निवडणूक म्हणून समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर काँग्रेसने मिळविलेला विजय म्हणजे भाजपाने शेतकऱ्यांप्रती दाखविलेली असंवेदनशीलता, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच राज्यातील व देशातील शेतकऱ्यांची झालेली दैना अवस्था या सर्व बाबींमुळे बळीराजांच्या मनात असलेली चीड व्यक्त करीत भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी मतदारांनी दिलेला कौल असल्याचे मत व्यक्त करीत ही परिवर्तनाची नांदी होय असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात आटोपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निकालांमध्ये काँग्रेस पक्षाच्या यश संपादनाने भाजप पक्षाला मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील उर्वरित बाजार समित्यांवरही काँग्रेसचाच झेंडा फडकणार असे स्पष्ट मत माजी मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. #VijayWadettiwar #Congress

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.