माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी डेटा व्यवस्थापन योग्य असण्याची आवश्यकता -अमिताभ कांत
भारत सरकार देशात डेटा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करत आहे. G-२० देशांनी सद्यपरिस्थित विकासासाठी माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी योग्य डेटा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, असं मत G -२० चे भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं. ते आज मुंबईत सुरु असलेल्या G-२० च्या विकास कृती गटाच्या पहिल्या बैठकीतल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना संबोधित करत होते. जगभरातल्या नागरिकांना डेटा सहज उपलब्ध व्हायला हवा यावर कांत यांनी यावर भर दिला. ‘राष्ट्रीय डेटा विश्लेषण मंचाद्वारे’ शासन पातळीवर भारत अधिक कुशलपणे काम करत असून प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली G -२० चं अध्यक्षपद निर्णायक पध्दतीनं आणि सर्वसमावेशक पद्धतीनं निभावलं जाईल, असं कांत यावेळी म्हणाले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे या बैठकीला संबोधित केलं. दरम्यान, बंगळुरू इथं G-२० च्या विविध प्रमुख मुद्द्यांवर आज बैठका होत असून यात जगभरातले १८० पेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. |