वैयक्तिक शौचालय बांधण्यास मनपातर्फे अनुदान
८९३४ नागरीकांनी घेतला लाभ
झोन कार्यालयात करावा अर्ज
चंद्रपूर २३ नोव्हेंबर - स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यास मनपातर्फे १७००० रुपयांचे अनुदान दिल्या जात असुन आतापर्यंत ८९३४ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
शौचालय अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबे जे वैयक्तिक शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते वैयक्तिक शौचालय बांधण्यास असमर्थ असतात अशा कुटुंबांना शौचालय अनुदान योजनेच्या सहाय्याने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
वैयक्तिक शौचालय अनुदान योजनेचा उद्देश हा लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जनजागृती करणे तसेच उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करणे आहे. त्यामुळे जे वैयक्तिक लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊन शौचालयाचे बांधकाम पूर्ण करतात, अश्या लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत अनुदान देण्यात येत आहे.
यात केंद्र शासनातर्फे रु.४०००/-, राज्य शासनातर्फे रु.८०००/- तर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रु.५०००/- असे एकुण १७००० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यास मिळते. शौचालय बांधकामाच्या स्थितीनुसार ४ टप्प्यात अनुदान दिले जाते. बांधकाम करतांना अनुदानाशिवाय अतिरिक्त खर्च झाल्यास तो खर्च लाभार्थ्यास स्वतः करावा लागतो.
या योजनेचा लाभ घेण्यास मनपाकडे ९०६७ नागरीकांनी अर्ज केला होता यातील कागदपत्रांची पुर्तता झालेल्या ८९३४ लाभार्थ्यांकडे वैयक्तीक शौचालय बांधण्याचे काम पुर्ण झाल्याने त्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. नागरिकांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपल्या शहराचे आरोग्य व पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
कोण करू शकतो अर्ज : महानगरपालिका हद्दीतील नागरीक ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाही
अर्ज कसा करावा : मनपा झोन कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करून अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड
२. रेशन कार्ड
३. मोबाईल नंबर
४. ई - मेल आयडी
५. पासपोर्ट साईज फोटो
६. बँक खात्याचा तपशील
अर्जदाराचे नाव हे या सर्व कागदपत्रात सारखेच असणे आवश्यक आहे.
शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र 2022 : Sauchalay Anudan ...