खाद्यतेलात भेसळ होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले असून अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीचा माल जप्त केला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळ अन्नपदार्थांविरोधात मोहीम तीव्र केली असून, गेल्या दोन महिन्यांपासून ही मोहीम सुरू आहे. दरम्यान, या दोन महिन्यात विविध प्रतिष्ठाणांवर धाडी घालून २८ किलो भगर आणि दीड लाख रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
सणासुदीच्या दिवसात खवा, मिठाई, खाद्यतेल, भगर यांना मोठी मागणी असते. हीच संधी साधून व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात या काळात भेसळ केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. भेसळ अन्नपदार्थातून विषबाधा होण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनाने ५७ नमुने घेतले आहेत. यात खवा १, मिठाई ८, फरसान १, खाद्यतेल १७, वनस्पती घी ४ आणि अन्य पदार्थांचे २६ नमुने घेतले आहे. तर १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे ३६ नमुने घेतले असून, ४ नमुने प्रमाणित तर ३२ नमुने प्रलंबित आहेत. भगरचे १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत ४ नमुने घेण्यात आले असून, ४ नमुने प्रलंबित आहेत. २८ किलो भगर जप्त करण्यात आला आहे. खाद्यतेलाचे १७ नमुने घेतले असून, चार प्रकरणात खाद्यतेल जप्त करण्यात आले. रिपाइंड सोयाबीन तेलाचा १०१९.१ किलोग्रॅम साठा जप्त करण्यात आला असून, १ लाख ४१ हजार ४१३ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.