चंद्रपूर शहराची समुद्रसपाटीपासून ची उंची नेमकी किती ?
चंद्रपूर शहरातील 'रेल्वे स्टेशन' वरील रेल्वेच्या बोर्डवर चंद्रपूर शहराची समुद्रसपाटीपासूनची असलेली उंची 361.800 मीटर इतकी दर्शवलेली आहे. तर चंद्रपूर शहरातीलच 'चांदाफोर्ट' या रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासून ची उंची 188.33 मीटर इतकी दर्शवलेली आहे. एकाच शहरातील दोन रेल्वेच्या बोर्डवर दोन वेगवेगळ्या उंची दर्शविलेल्या आहेत. चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन पासून तर चांदाफोर्ट स्टेशन पर्यंतचे अंतर फक्त 2.5 किलोमीटर इतके कमी आहे. परंतु या दोन स्थानांच्या उंचीतील फरक 173.47 मीटर इतका दाखवला आहे, चंद्रपूर शहराच्या वेगवेगळ्या भागातील उंचीतील फरक हा पाच मीटर पेक्षा जास्त नसावा, चंद्रपूर हे मैदानात वसलेले शहर आहे, परंतु असे असतानाही एकाच शहरातील दोन ठिकाणच्या रेल्वे स्टेशन मधील उंचीतील फरक तब्बल 173.47 मीटर इतका असल्याने चंद्रपूरकरांना त्यांच्या शहराची नेमकी उंची किती ? हा प्रश्न पडलेला आहे. What is the exact height of Chandrapur city from the sea level?
सर्वे ऑफ इंडिया च्या टोपोग्राफिकल नकाशावर आजही चंद्रपूर रेल्वे स्थानकाची उंची 189.00 मीटर इतकीच दर्शविलेली आहे. स्टेशन मास्टर चंद्रपूर आणि बल्लारशाह यांना आपल्या चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या बोर्डवरची माहिती चुकलेली आहे, ती या रेल्वेच्या बोर्डवर आधी 189.00 मीटर इतकी होती असे जनता महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्राध्यापक योगेश दुधपचारे यांनी दोन वर्षांपूर्वीच निदर्शनात आणून दिले होते, परंतु नागपूर येथील विभागीय कार्यालयातून निर्देश असल्याने आम्ही ते तसे लिहिले असे बल्लारशाह येथील स्टेशन मास्टर यांनी सांगितले होते. यानंतर प्राध्यापक दुधपचारे यांनी माहितीचे अधिकारात सेंट्रल रेल्वे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय नागपूर यांना हि उंची 189.00 मीटर वरून अचानक 361.800 मीटर इतकी कशी वाढली याबद्दलची विचारणा केली असता, त्यांना चुकीची माहिती पुरविण्यात आली, आम्ही कोणतीच उंची बदलविली नाही, चंद्रपूर रेल्वे स्थानकाची उंची 361.800 मीटर इतकीच आहे, असे चुकीचे उत्तर त्यांना देण्यात आले.