संजीव बडोले/ जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध | आज १६ मे रोज शनिवारला रात्री दोन अडीच वाजेच्या दरम्यान बोरटोला येथील पतीकुमार रणदिवे यांच्या घरी गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला. एक शेळीचा करडू व शेळीला ठार मारले अंदाजे दोन ते तीन हजार रुपयाचे रणदिवे यांचे नुकसान झाले आहे.
रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास बोरटोला निवासी पतीकुमार रणदिवे यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून शेळीचा एक कर्डलू (पाटरु) घेऊन बिबट गेला. बिबट आल्याची चाहूल लागताच पतीकुमार रणदिवे हे रात्रीच घराच्या बाहेर पडले. बिबट्याला हाकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु उलट बिबटया त्यांच्या अंगावर चालून आला. भीतीमुळे पतीकुमार हे आपल्या घरात शिरले. त्यावेळी त्यांच्या अंगाला थरकाप सुटला होता.
पुन्हा बिबट आला व त्याने गोठ्यात खुंटाला बांधलेल्या शेळीचा फडसा पाडला. घरातून रणदिवे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली असता,बिबट तिथून पसार झाला.
शेळी व बिबट्याचे पायाचे ठसे गोठ्याच्या आजूबाजूला उमटलेले दिसले. अंदाजे दोन ते तीन हजार रुपयाचे रणदिवे यांचे नुकसान झाले आहे.
वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रणदिवे यांच्या येथील घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.त्यानंतर याच बिबट्याने गोविंदा ब्राह्मणकर यांच्या घरी गोठ्यात रात्रीच आपला मोर्चा वळविला.
गोठ्यात बंद असलेल्या शेळ्या वर हल्ला करण्यासाठी,गोठयाच्या दाराला बिबट्याने धक्का दिला.परंतु गोविंदा ब्राह्मणकर यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने, तिथूनही बिबट्याने काढता पाय घेतला. ब्राह्मणकर यांचे अंगणात बिबट वाघाच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. गेल्या ७-८ दिवसापासून गावातील अनेक कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.मागील महिन्यात उमरी,सावरटोला येथीलही दहा ते बारा कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या होत्या.
बोरटोला, उमरी सावरटोला या तिन्ही गावातील लोक गाई,म्हशीं, शेळया, बकरे पाळत आहेत. त्यामुळे गोपालकांचे देखील धाबे दणाणले आहेत. त्यांच्या आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. सायंकाळ झाली की या तिन्ही गावच्या नागरिकात धाक धुक वाढत असते. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून गावात बिबट वाघ फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आतापर्यंत बिबट्याने दहा-बारा कोंबड्या फस्त केल्याची माहिती आहे.शेताच्या बाजूने गावात हा बिबट प्रवेश करीत असतो. बहुतेक तो भिवखिडकी, पिंपळगाव,बोरटोला, इंजोरी च्या जंगलातून येत असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. वन्यजीव मानव संघर्ष होऊ नये. म्हणून वन विभागाने वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बोरटोला ग्रामवासियांनी केली आहे.