मुल येथे 29 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
चंद्रपूर, दि. 25 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व कर्मवीर महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सदर मेळावा मुल तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
या मेळाव्यामध्ये आस्क फर्स्ट एचआर डेस्क, बजाज ऑटो लिमिटेड, फ्लाश इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, हेक्सावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड, सनसेरा इंजीनियरिंग, लूकास टीव्हीएस लिमिटेड, सेंट गोबेन, रेडिअन्स पॉलीमर, रविराज हायटेक, क्रोमोवेल, अॅलेस्टी म्युच्युअल फंड निधी लिमिटेड, रिन्सन मॅन्युफॅक्चर अँड सर्विस प्रा. लि., नवभारत फर्टीलायझर लिमिटेड आदी कंपन्या सहभागी होत असून त्यामध्ये फिल्ड ऑफिसर, लोन प्रतिनिधी, सेल्स ट्रेनी, ऑपरेटर, टर्नर, फिटर, कस्टमर सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह इत्यादी प्रकारची पदे भरण्यात येणार आहे. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे व मुंबई येथे रोजगाराची संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. सदर कंपन्यांमध्ये जवळपास एकूण 351 रिक्त जागा असल्याचे कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे.
तसेच दि. 30 व 31 जुलै रोजी कंपन्यांचे व्यवस्थापक ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता उपस्थित राहणार आहेत. जे उमेदवार 29 जुलैच्या ऑफलाईन मेळाव्याकरीता उपस्थित राहू शकणार नाही ते उमेदवार ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात. ऑनलाइन मेळाव्यात सहभागी होण्याकरिता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी व ऑनलाइन अप्लाय करावे.
अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
#Rojgar #Melava #Job