उच्च न्यायालयाचे अधिष्ठाता यांना निर्देश : डेरा आंदोलनाला मोठे यश
चंद्रपूर : मागील सोळा महिन्यापासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनाबाबत 22 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीत दोन आठवड्यात (6 जुलै)च्या आत कंत्राटी कामगारांचे वेतन न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अशोक नितनवरे यांना दिले आहे. यामुळे डेरा आंदोलनाला मोठे यश आले आहे.
विधिज्ञ ऍड. निरज खांदेवाले यांनी उच्च न्यायालयामध्ये आंदोलनकर्त्या कामगारांची बाजू मांडली.
कोरोना काळातील थकीत वेतनासाठी जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. अनेक महिने लोटूनही वैद्यकीय महाविद्यालयाने आंदोलनकर्त्या कामगारांचे थकित वेतन अदा केलेले नाही.आंदोलनकर्त्या कामगारांच्या जागेवर नविन कामगारांची नियुक्ती केली. याविरोधात आंदोलनकर्त्या कामगारांनी चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयात दाद मागितली होती. 20 एप्रिल 2022 रोजी चंद्रपूर च्या औद्योगिक न्यायालयाने याप्रकरणात अंतरिम आदेश देताना सर्व कामगारांचे थकीत वेतन 30 दिवसांत औद्योगिक न्यायालयात जमा करावे, आंदोलनकर्त्याच्या जागेवर घेतलेल्या नवीन कामगारांना कामावरून कमी करून आंदोलनकर्त्या कामगारांना त्यांच्या पदावर पूर्ववत रुजू करावे असे आदेश वैद्यकीय महाविद्यालयाला दिले होते. औद्योगिक न्यायालयामध्ये विधीज्ञ एडवोकेट प्रशांत खजांची व त्यांचे सहयोगी एड. मोहन निब्रड यांनी कामगारांची बाजू मांडली होती.
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात वैद्यकीय महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अपील केली. 22 जून रोजी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सर्व कामगारांचे थकीत वेतन 2 आठवड्यामध्ये न्यायालयात जमा करण्याचे आदेश चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे. मात्र पुढील दोन आठवड्यामध्ये कामगारांना त्यांचे थकित वेतन मिळणे आता निश्चित झाले आहे.
शिक्षा होईपर्यंत लढा देणार
सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु दर्शना झाडे व इतर तीन कामगाराबाबत चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी वैद्यकीय महाविद्यालयाने केली नाही. त्यामुळे चंद्रपूरच्या कामगार न्यायालयात अधिष्ठाता डाॅ. अशोक नितनवरे यांच्या विरोधात न्यायालयाची अवमानना केल्याची तक्रार दाखल केली आहे. इतर कामगारांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सर्व कामगारांचे थकीत वेतन दोन आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. हे आंदोलनाचे मोठे यश आहे. परंतु जोपर्यंत सर्व कामगारांना थकित वेतन मिळत नाही, कामगारांना त्यांच्या पदावर पूर्ववत रूजू करून घेण्यात येत नाही व दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरु राहील.
- पप्पू देशमुख अध्यक्ष जनविकास सेना चंद्रपूर
#Chandrapur | Pappu Deshmukh
Pappu Deshmukh. @PappuDeshmukh. Founder President, Jan Vikas Sena, Member of Chandrapur City Municipal Corporation. Chandrapur Maharashtra