📌 व्यवसायकर उपायुक्त यांच्याकडे विदर्भ मुख्याध्यापक संघाची मागणी
📌 शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा
नागपूर - अनुदानित शाळांना गेल्या पाच वर्षांचे व्यवसायकराचे रिटर्न भरण्यासाठी व्यवसायकर विभागाने विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशी आग्रही मागणी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवसायकर उपायुक्त श्रीमती शिला मेश्राम यांच्याकडे आज (ता १८) केली.
व्यवसायकर विभागातर्फे ६ मे २०२२ रोजी पत्र काढून सर्व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रमाध्यमिक शाळा महाविद्यालये यांना व्यवसायकराचे e - returns भरण्यासाठी फर्मान काढले आहे. यामुळे मुख्याध्यापक वर्गाची मोठ्या प्रमाणात भर उन्हात धावपळ सुरू आहे.
व्यवसायकर विभागातर्फे २०१७ - २०१८ मध्ये व्यवसायकराचे e-returns फाईल करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. Book Adjustment मुळे शाळांनी सन २०१७ पासून e - returns भरले नाही. मात्र अचानक आलेल्या पत्राने तसेच प्रतिवर्ष १००० रुपये दंडाने मुख्याध्यापक वर्ग हादरला आहे. शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या e - returns साठी अभय योजना २०२२ आणली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने होत नाही. अनेक शाळांचे प्रोफाइल बनले नाहीत, प्रोफाईल बनल्यावर ईमेल येत नाही, त्यामुळे पासवर्ड मिळत नाही यासारख्या अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी संदर्भात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) संलग्न विदर्भ मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते मा श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवसायकर उपायुक्त श्रीमती मेश्राम मॅडम यांची भेट घेऊन त्यांना या त्रुटीची माहिती करून दिली. तसेच मुख्याध्यापकांना होणारा त्रास लक्षात घेता विशेष शिबिराचे आयोजन करण्याची मागणी केली. यावेळी व्यवसायकर उपायुक्त श्रीमती शिला मेश्राम यांनी त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून सर्व शाळांनी तातडीने व्यवसायकराचे e - returns फाईल करण्याचे आवाहन केले. या बैठकीला नागपूर विभागीय सचिव व मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक श्री खिमेश बढिये, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, व्यवसायकर अधिकारी श्री प्रमोद पिंगे, मुख्याध्यापक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री धिरज यादव, विभागीय महिला संघटक सौ प्रणाली रंगारी, टिईटी जिल्हा संघटक श्री भिमराव शिंदेमेश्राम उपस्थित होते.
मुख्याध्यापकांनी PT संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक श्री गणेश खोब्रागडे यांच्याशी *8999685099* यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.