Citizens demand control over illegal coal transportation
माथरा येथील नागरिकांची मागणी
अन्यथा आंदोलनाचा इशारा
राजुरा | गोवरी पवणी, माथरा राजुरा मार्गावरून दररोज शेकडो कोळसा वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड गाड्या धावत असतात. या रोडची क्षमता दहा ते वीस टनाची असताना 60 ते 70 टन कोळसा वाहून येणारे वाहने दररोज ये-जा करतात. कोळसा वाहून नेणाऱ्या प्रकारांवर ताडपत्री ही झाकलेली नसते. त्यामुळे कोळशाचे कण हवेत मिसळतात व धुळीचा त्रास नागरिकांना होतो. अवजड वाहने भरधाव वेगाने वाहने धावतात त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तरी ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी किंवा दुसऱ्या मार्गाने वळविण्यात यावी, अशी मागणी सरपंच हरिदास झाडे यांच्या नेतृत्वात माथरा येथील जनतेने पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
शिष्टमंडळात भाऊराव मते, महादेव दरेकर, बाबुराव पेठकर ,सुधाकर सुरतेकर, किशोर नहाके यांची उपस्थिती होती.राजुरा- पोवनी मार्गावरील रस्ते अरुंद आहेत. गावात पार्किंग कुठेही केली जाते .गावातून जाताना भरधाव वेगाने ओव्हरलोड ट्रक धावतात यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. मागील आठवड्यात भरधाव ट्रकने तिन बैलांना धडक दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झालेले आहे. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. या मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत आहेत. जड वाहतुकीमुळे धुळीचा त्रास प्रचंड वाढलेला आहे .याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहेत जनतेच्या समस्यांकडे कुणाचेही लक्ष नाही.आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. या मार्गावर धावणारे अनेक जड वाहनांना नंबर प्लेट नाहीत. रिफ्लेक्टर नाहीत.
गाड्यांना इंडिकेटर नसतात. शिवाय अप्रशिक्षित वाहनचालक असतात. परिवहन विभागाकडून यांची तपासणी होत नाही. ट्रक चालक भरधाव वेगाने गाड्या चालवतात त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन घेऊन प्रवास करावा लागतो. ट्रकचालकांना याबाबत वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र ते मुजोरी करून गाड्या वेगाने नेतात. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अतिशय धोकादायक झालेला आहे.धुळीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे माथरा येथील सर्व ग्राम वासियांची आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी.किंवा ही जड वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात यावी.अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.