तीन संशयित वनविभागाच्या ताब्यात.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१४ मार्च:-
अर्जुनी-मोर तालुक्यातील वनक्षेत्र नवेगावबांध च्या सहवन क्षेत्र बाराभाटी बीट क्षेत्र चांन्ना बाकटी अंतर्गत येणाऱ्या इंजोरी येथे गावालगत च्या शेतात काल दिनांक १३ मार्च रोज रविवारला वनक्षेत्र नवेगाव बांध अंतर्गत सहवन क्षेत्र बाराभाटी अंतर्गत,बीट क्षेत्र चांन्ना बाकटी अंतर्गत येणाऱ्या इंजोरी येथे अस्वलाची अवैध शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.शिकार्यांनी चितळ व रान डुक्कराचे मांस आहे, अशी बतावणी करून अर्जुनी मोरगाव येथे विक्री केली.
मांस शौकिनांनी चितळ व रानडुकरा चे समजून त्यावर येथेच्छ ताव मारला. मटणावर ताव मारणाऱ्यांचे वन विभागाच्या चौकशी ने धाबे दणाणले आहेत. अशी कुजबूज नगरात सुरू आहे.अस्वल शिकार प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये कारवाई करून, अज्ञात अज्ञात वन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपासादरम्यान अर्जुनी मोरगाव येथील ३ संशयितांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मटणावर ताव मारणाऱ्यांचे वन विभागाच्या चौकशी ने धाबे दणाणले आहेत. अशी कुजबूज नगरात सुरू आहे.
इंजोरी येथील शेतकरी हेमराज धनीराम शेंडे यांच्या शेतात गट क्रमांक १७४ येथे नर अस्वलाची अवैध शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
मौजा इंजोरी रहिवासी हेमराज धनीराम शेंडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे १३ मार्च रोजी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी ९.०० वाजता यांच्या शेतात गट क्रमांक १७४ मध्ये जाऊन मोका तपासणी केली असता वन्य प्राण्यांची आतडी, कातडी तसेच पंजे घटनास्थळावर आढळून आले. पशु विकास अधिकारी डॉ.एस. बी.वाघाये, पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१ डॉ. शितल वानखेडे सडक अर्जुनी यांना बोलावून, मृत अस्वलाचे शव विच्छेदन करण्यात आले. ही शिकार बंदुकीची गोळी झाडून केल्याचे शव विच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. सदर शिकारी बाबत अज्ञात आरोपीविरुद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत वन्यप्राणी अस्वलाचे घटनास्थळावर फक्त कातडे,आतडे व पंजे कापलेल्या स्थितीत आढळले.बाकी संपूर्ण अवयव लापता असून, त्याचा शोध वन विभाग चौकशी पथक घेत आहे. लापत्ता असलेल्या मांसाची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या मृत अस्वलाचा मांसाची विक्री अर्जुनी मोरगाव येथे करण्यात आल्याचे समजते. अज्ञात शिकार्यांनी चितळ व रान डुकराचे मांस असल्याचे सांगून, अर्जुनीमोर नगरातील व आजूबाजूच्या गावातील मांस खाणाऱ्या शौकिनांना विकल्याचे समजते. मांस खाण्याची आवड असणाऱ्या मटन शौकीनांनी चितळाचे व रान डुकराचे मांस समजून, त्यावर यथेच्छ ताव मारल्याची चर्चाआहे. चौकशी दरम्यान श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.
मागील बऱ्याच दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार वीज प्रवाहाने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु अस्वलाची शिकार बंदुकीची गोळी झाडून झाल्याने, आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन वनविभागा पुढे आहे.
सदर प्रकरणाचा तपास प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक डी. व्ही. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आय. दोनोडे हे करीत आहेत. या शिकार प्रकरणात आणखी किती मासे अडकतात हे चौकशीतून निष्पन्न होईलच.
कोट.
शिकारीची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित
झाले. साक्षीदारा समक्ष पंचनामा करून मृत नर अस्वलाचे अवयव ताब्यात घेतले.बीट क्षेत्र चांन्ना बाकटीचे वनरक्षक कु.एम. एम. शेंडे यांनी वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,४४,४८, अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
-वनक्षेत्राधिकारी आर. आय. दोनोडे,
प्रादेशिक वनक्षेत्र कार्यालय नवेगावबांध.