चंद्रपुरातील प्रदुषणाच्या समस्येबाबत पालकमंत्र्यांचे उर्जा व पर्यावरण मंत्र्यांना पत्र
जागतिक स्तरावर चंद्रपूर शहराची प्रदूषित शहरांच्या यादीत गणना होत आहे. येथील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
राष्ट्रीय हरीत लवादाने जाहीर केलेल्या क्रमवारीत चंद्रपूर शहर हे राष्ट्रीय स्तरावर सातव्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. इतर उद्योगाद्वारे शहरात प्रदुषण होत असले तरी सर्वात जास्त प्रदूषण शहरालगत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. परिपूर्ण पर्यावरणीय निर्देशांक कृती आराखड्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा, प्रमुख भागधारक म्हणून समावेश करण्यात आला असून प्रदूषण कमी करण्याकरीता अधिक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राद्वारे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरीता कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चंद्रपूर शहर व परिसरातील वातावरण तसेच नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकांना गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गंभीर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राद्वारे वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्या करता तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी पत्रात नमुद केले आहे.
#Chandrapur #Polution