शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
: दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय दीपक शर्मा दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी ,प्रथम श्रेणी, भद्रावती हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री माननीय चैतन्य कुलकर्णी साहेब सह दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी, प्रथम श्रेणी, भद्रावती तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्ञानेश हटवार सचिव वि. सा. संघ शाखा भद्रावती, डॉ. सुधीर मोते अध्यक्ष वि. सा. संघ शाखा भद्रावती, एडवोकेट कुणाल
पथाडे अध्यक्ष, तालुका बार असोसिएशन भद्रावती हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मार्गदर्शन करताना, "मराठी ही आपली मातृभाषा असून तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे . मराठी भाषेचे संवर्धन झाले तरच महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहील" असे मत व्यक्त केले. तर डॉ. सुधीर मोते यांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेतील समृद्ध असलेला म्हणींचा ठेवा व त्याचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री. दीपक शर्मा यांनी मराठी भाषेचा अवीट गोडवा सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट श्री. सुरतेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एडवोकेट कुमारी खडसे यांनी केले .
कार्यक्रमाला तालुका बार असोसिएशनचे सर्व सदस्य, न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील श्री अरुण वाडगुरे व त्यांच्या टीमने सहकार्य केले.