संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२४ जानेवारी:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सावरटोला गावातील समृद्धी व संकल्प ग्राम संघा अंतर्गत महिला बचत गटांनी सविता वलथरे व कविता डोये यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसंघ कार्यलयातुन ग्रामपंचायत कार्यालयावर शेकडो महिला, पुरुष, युवक यांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायत सावरटोला कार्यालयावर धडक दिली. मागील दहा वर्षापासून गावात अवैध दारू विक्री बंद होती. परंतु मागील वर्षीपासून पुन्हा गावातील चार व्यक्ती अवैध दारू विक्री करीत आहेत. याबाबत आक्टोंबर २०२१ ला झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत गावातील अवैध दारू बंद करण्यात यावी,याबाबत ठराव झाला होता. परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी मात्र अद्यापही झाली नव्हती. ठरावाची अंमलबजावणी का झाली नाही? याचा जाब विचारण्यासाठी सावरटोला गावातील शेकडो महिला, पुरुष आणि युवकांनी गावातील दारूबंदी विरुद्ध आज दिनांक २४ जानेवारी रोज सोमवारला एल्गार पुकारला. ग्रामपंचायत मध्ये सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत ची मासिक सभा सुरू होती.दुपारी साडेबाराच्या दरम्यान महिला, पुरुष व युवकांचा मोर्चा ग्रामपंचायतवर येऊन धडकला.
महीलांनी सरपंचांना विचारणा केली असता, त्यांनी महिलांशी चर्चा केली . सरपंच व मोर्चेकरी महिला यांच्यात चर्चा झाली.मोर्चेकरी महिलांना सरपंच युवराज तरोने व सदस्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संतप्त मोर्चेकरी महिलांनी ग्रामपंचायत ला कुलूप लावला. सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना तब्बल एक तास ग्रामपंचायत मध्ये कोंडून ठेवले.
त्यानंतर सरपंच युवराज तरोणे यांनी पोलिस ठाणे अर्जुनीमोर येथे फोन करून पोलिसांना मोर्च्याची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी कुलुप उघडला व त्यांची सुटका केली.
महीलानी ग्रामपंचायत मध्ये सरपंचांना निवेदन दिले. अर्जावर चर्चा करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन सरपंच युवराज तरोणे यांनी दिले. संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य,सचिव, पोलीस यांच्याशी आंदोलन करणाऱ्या महिलांनी चर्चा केली. चर्चेनंतर सरपंच युवराज तरोणे व पोलिस यांनी आंदोलनकारी महीलांना आश्वासन दिले. गावात जे अवैधरीत्या दारू विक्री करतात,त्यांना नोटीस बजावण्यात येणार व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. असे सरपंच व पोलीसांनी यांनी यावेळी सांगितले. तेव्हा कुठे मोर्चेकरी महिला, पुरुष व युवक शांत झाले व आपले आंदोलन मागे घेतले.
कोट
ऑक्टोंबर २०२१ ला झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. संचारबंदी मुळे या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. गावात दारूबंदी व्हावी ही आपली इच्छा असून, महिलांना सोबत घेऊन आपण गावातील दारूबंदी बाबत पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे जाऊन विनंती करणार आहोत.
-सरपंच युवराज तरोणे,
ग्रामपंचायत सावरटोला.