सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
रचनाताई व नंदाताई गहाणे या सख्या जावांच्या उमेदवारीमुळे निवडणूक लक्षवेधी.
आघाडीच्या घटक पक्षातील उमेदवारांमुळे मत विभाजन.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१८ डिसेंबर:-
अर्जुनीमोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध जिल्हा परिषद क्षेत्र हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व भारतीय जनता पक्ष अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळेल. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचनाताई चामेश्वर गाहणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदाताई लोकपाल गाहणे तर काँग्रेस पक्षाच्या रूपलता देवाजी कापगते यांच्यात तिरंगी लढतआहे. रचनाताई व नंदाताई ह्या थोरल्या व धाकट्या सख्या जाऊबाई आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होऊन लक्षवेधी झाली आहे. नंदाताई ह्या अर्जुनीमोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष लोकपाल गहाणे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. हे येथे उल्लेखनीय आहे. त्यामुळे या ठिकाणी ही निवडणूक प्रतिष्ठेची व चुरशीची होणार आहे. याची प्रचिती सिरेगावबांध ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या वेळीही अनुभवयास मिळाली होती. भारतीय जनता पक्षाकडून सिरेगावबांध ग्रामपंचायत राष्ट्रवादीने खेचून आणली होती.राष्ट्रवादीने भाजपाकडून ही ग्रामपंचायत खेचून आणले असून, गेल्या १५ वर्षापासून रचनाताईच्या स्वगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व या ग्रामपंचायत वर आहे.
मागील वेळी जिल्हा परिषद क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किशोर तरोणे यांनी विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. यावेळी ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या मतदारसंघात विविध पक्षाचे ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य आजमावत आहेत.यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रूपलता देवाजी कापगते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नंदा लोकपाल गहाणे, भारतीय जनता पक्षाच्या रचनाताई चामेश्वर गहाणे, बहुजन समाज पक्षाच्या सुषमा यशवंतराव बोरकर, वंचित बहुजन आघाडी च्या सुशीला दिलेश्वर राऊत, शिवसेनेच्या योगिता सुनील सांगोळकर असे सहा उमेदवार एकमेका विरुद्ध दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य आजमावत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नवेगावबांध व देऊळगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांचा रचनाताई गहाणे यांना अंतर्गत विरोध आहे. २१ डिसेंबर पर्यंत हा विरोध मावळतो की कायम राहतो. यावर बरेच काही अवलंबून आहे. नाहीतर ही जागा भाजपासाठीही सहज नाही.पक्षांतर्गत विरोध हे रचनाताई गहाणे यांच्यासमोर आव्हान आहे . काँग्रेसच्या उमेदवार रूपलता कापगते ह्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य आजमावत आहेत. त्यांचे पती देवाजी कापगते काँग्रेसच्या किसान आघाडीचे प्रमुख आहेत. आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची जिल्हा परिषद, पंचायत,समिती निवडणुकीत आघाडी नाही. त्यामुळे या तिन्ही पक्षांना मत विभाजनाचा फटका बसू शकतो. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आघाडीतील हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे मत विभाजनाचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळू शकतो.आघाडीतील काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांची वर्चस्वाची लढाई या निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळत आहे. त्यामुळे एकीने नव्हे तर बेकीने हे तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध दंड ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.
काही वर्षांपासून बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात सक्रिय नसल्यामुळे, त्यांचे उमेदार किती मते घेतात. हे निवडणुकीनंतर मतदानातूनच स्पष्ट होईल. सध्यातरी दोन सख्या जावांच्या उमेदवारीमुळे या मतदार संघात निवडणूक रंगतदार झाली असून, तालुका व जिल्ह्यात या मतदार संघाची चर्चा रंगली असून, तालुका बरोबरच जिल्ह्याचे लक्षही या मतदारसंघाकडे लागले आहे.
आघाडीतील शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती नाही. त्यामुळे मत विभाजनाचा फायदा भाजपाला होऊ शकतो. भाजपाच्या रचनाताई गहाणे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदाताई गहाणे ह्या सख्या जावा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.रचनाताई गाहणे यांना पक्षांतर्गत विरोध आहे. नवेगावबांध व देऊळगाव येथील भाजपा प्रमुख कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत रचनाताईंना होणारा विरोध मावळेल कि कायम राहील?त्यामुळे भाजपाला ही निवडणूक सोपी नाही. जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेस पक्षाला देखील आपली अस्तित्वाची लढाई या निवडणुकीच्या निमित्ताने लढायची आहे. त्यामुळे विजयासाठी काँग्रेसच्या उमेदवार रुपलता कापगते यांनाही बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. बसपाचे उमेदवार सुषमा बोरकर घरोघरी जाऊन व्यक्तीशहा भेटत आहेत. काँग्रेस,भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचाराचा नारळ फोडून अक्षरशहा प्रचाराच्या माध्यमातून गावोगावी व्यक्तिगत संपर्कावर भर देत आहेत .मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तरोणे यांनी बाजी मारली होती. याही निवडणुकीत राष्ट्रवादी ही जागा कायम ठेवेल काय? याबाबतची उत्सुकता मतदारात
शिगेला पोहोचली आहे.