पुणे दि.१७: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, समाज कल्याण उपायुक्त विजय गायकवाड, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा आणि भावनीक कार्यक्रम आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्याला अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी आणि सुविधा निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अल्पकालिन आणि दीर्घकालिन नियोजन करण्यात येत आहे. सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्या येईल.
कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना बाधितांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथा आणि परंपरेला पुढे नेतांना दक्षताही बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना सोहळ्यापासून दूर ठेवल्यास संसर्गाचा धोका कमी होईल. तसेच सोहळ्याला येण्यापूर्वी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.नारनवरे म्हणाले, विजयस्तंभाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय युद्ध स्मारक करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. तसेच अभिवादन सोहळ्यासाठी निधीदेखील मंजूर केला आहे. सर्वांना सोबत घेऊन या परिसरात चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन करावयाचे असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. समाज कल्याण विभागातर्फे सोहळ्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले.
श्री.शिसवे म्हणाले, बंधुतेच्या भावनेने सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. समितीला केलेल्या सूचनेनुसार सूक्ष्म नियोजन करून सर्वांच्या सहकार्याने सोहळा यशस्वी करण्यात येईल.
श्री.गजभिये म्हणाले, यावर्षीचे आयोजन ऐतिहासिक ठरणार आहे शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केल्याने नियोजन चांगल्या पद्धतीने होईल. नागरिकांनी संपूर्ण नियोजनात संयमाने सहभागी व्हावे.
श्री.देशमुख म्हणाले, वाहतूकीतील बदलांविषयी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येईल. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा करावा.
आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेतर्फे ५० तात्पूरती रुग्णालये, १५ रुग्णवाहिका, पाण्याचे१०० टँकर, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, पुरेशा प्रमाणत शौचालये आदी व्यवस्था करण्यता येत आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क देण्यात येणार आहे. नागरिकांनी सोहळ्यादरम्यान मास्क वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.
विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
0000