वनतस्करांच्या हल्ल्यात जखमी वनमजुराचा मृत्यू
◆ मेडीगट्टा बॅरेज नाक्यावरील घटना
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून 23 किमी अंतरावर असलेल्या पोचमपल्लीजवळील मेडीगट्टा बॅरेजकडे जाणा-या मार्गावर वनविभागाच्या नाक्यावर कर्तव्यावर असणा-या वनमजुराची अज्ञात वनतस्करांनी 6 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री धारदार चाकुने हल्ला करुन जखमी केले होते. सदर जखमी वनमजुराचा 9 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हैद्राबाद येथील गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. समय्या मदनय्या गोरा (45) रा. वर्धम असे मृत वनमजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार वनतस्करी रोखण्यासाठी सिरोंचा वनविभागाने मेडीगट्टा बॅरेजकडे जाणा-या मार्गावर तपासणी नाका लावला आहे. सागवानाची अवैधरित्या तस्करी होवू नये म्हणून तेलंगाणाकडून ये-जा करणा-या वाहनांची वन विभागाचे कर्मचारी तपासणी करीत असतात. नेहमीप्रमाणे 6 नोव्हेंबर रोजी तपासणी नाक्यावर दोन रोजंदारी वनमजूर व 2 वनरक्षक कार्यरत होते. दरम्यान मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास 2 दुचाकीवर एकूण 4 वनतस्कर याठिकाणी आले. त्यांनी अंबडपल्ली जात असल्याचे सांगत नाक्यावर आले. कार्यरत कर्मचा-यांना काही समजण्यापूर्वीच त्यातील एका तस्कराने धारदार चाकुने रोजंदारी वनमजूर समय्या गोरा याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर आरोपी फरार झाले. जखमी वनमजुराला अगोदर सिरोंचा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने हैद्राबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 9 नोव्हेंबर रोजी जखमी वनमजूर सोमय्या गोरा यांचा मृत्यू झाला.
सदर कृत्य वनतस्करांनी वनविभागाप्रती सुडाच्या भावनेने केले असून मेडीगट्टा येथे वनउपज तपासणी नाका उभारल्यामुळे अवैध वाहतुकीवर आळा बसलेला आहे. वनतस्करांचे मनोबल खचल्यामुळेच ते या प्रकारचे कृत्य करीत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांनी म्हटले आहे.
Forest worker injured in forest smuggler's death