जादूटोणाविरोधी कायद्यावर कार्यशाळा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आयोजन
चंद्रपूर:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर तर्फे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संविधान दिनी जिल्ह्यातील शासकीय/ अनुदानित आश्रम शाळांमध्ये कार्यरत मुख्याध्यापक, अधिक्षक आणि महिला अधिक्षकांची "वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजन करण्यात आली.
Chandrapur Maharashtra
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे होते. तर पोलिस उपअधिक्षक (गृह) शेखर देशमुख यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निलय राठोड, राजेश धोटकर, श्री बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक हरिभाऊ पाथोडे यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावीरित्या अनेक घटनांच्या उदाहरणांसह मांडणी करून अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे महत्त्व पटवून दिले तर अनिल दहागांवकर व धनंजय तावाडे यांनी तंत्र-मंत्र, बुवाबाजी, जादूटोणा, करणी, देवी अंगात येणे, मानसिक आजार, आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
शेखर देशमुख यांनी संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपात अनेक तथाकथित बाबा - महाराजांचे प्रस्थ वाढले असून यावर मात करण्यासाठी समाजात विवेकी जिवनशैली व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. रोहन घुगे यांनी कार्यशाळेतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन संपन्न विद्यार्थी घडविण्याचे आवाहन केले तर विद्युत वरखेडकर यांनी कार्यशाळेचे महत्व विशद करून अंधश्रद्धानिर्मूलन कार्याची व्यापकता वाढविण्याची गरज व्यक्त केली. निलय राठोड यांनीही समयोचित विचार मांडले.
जिल्ह्यात नुकतेच अंधश्रद्ध मानसिकतेतून ग्रामीण आदिवासी बहुल भागात घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत जिल्ह्यातील आश्रम शाळेमध्ये कार्यरत मुख्याध्यापक, अधिक्षक व अधिक्षिका सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रिती कुत्तरमारे यांनी केले तर आरती दुधकुंवर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.