Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१

जिल्हा परिषदेची निवडणूक शांततेत | 6 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार ZP Election Nagpur



नागपूर दि. 05 : नागपूर जिल्ह्यातील 16 जिल्हा परिषद गट व 31 पंचायत समिती गणासाठी आज झालेली पोटनिवडणूक शांततेत पार पडली. कोरोना साथीच्या उद्रेकानंतर झालेल्या या निवडणुकीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. उद्या दिनांक 6 ऑक्टोबरला सकाळी दहा नंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निवडणूक निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी व पंचायत समितीच्या 31 गणांसाठी जिल्ह्यामध्ये जवळपास 50 टक्के मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिंग पार्ट्या प्रत्येक तालुक्याच्या तहसिल व निर्धारीत मतमोजणी कार्यालयात येत असून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील अधिकृत टक्केवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सोळा गटांसाठी 79 तर पंचायत समितीच्या 31 गणांसाठी 125 उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात सहा लक्ष सोळा हजार सोळा मतदार असून त्यांच्यासाठी 1 हजार 115 केंद्रावर मताधिकार बजावण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली होती.

आज सकाळी सात ते साडे नऊ या काळात जिल्हा परिषदेसाठी 10.50 टक्के तर पंचायत समितीसाठी 10.94 टक्के मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यत ही आकडेवारी जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघात 50.51% तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघात 50.21 टक्के इतकी होती. रात्री उशिरापर्यंत या संदर्भातील आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात आज झालेल्या मतदानात युवकांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. उद्या बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी दहा वाजता पासून भागातील सुरू होईल. उद्या दुपारपर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

उद्या नरखेड पंचायत समिती सभागृह, काटोल येथे प्रशासकीय इमारत, कळमेश्वर येथील तहसील कार्यालयातील तळमजला, सावनेर येथे तहसील कार्यालय, रामटेक येथे घनश्याम किंमतकर सभागृह, मौदा, कामठी, नागपूर ग्रामीण, हिंगणा, उमरेड, कुही, भिवापूर या ठिकाणची मतमोजणी तहसिल कार्यालयात सकाळी 10 पासून सुरू होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.