गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा चंद्रपूर येथील ईरइ नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबरच्या रात्री घडली आहे.दरम्यान आज मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला. प्रविण वनकर असे मृत युवकाचे नाव आहे. १९ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पोलीस कर्मचारी व मनपा कर्मचारी आपली सेवा देत होते. मात्र विसर्जन आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी ही दुःखद घटना घडली.
चंद्रपूर शहरातील बोकारे प्लॉट रामनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी १९ सप्टेंबर अनंतचतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोमवारी गणेश विसर्जन मिरवणूक काढत रात्री ९:३० वाजताच्या सुमारास हे मंडळ विसर्जन स्थळी पोहोचले. या मंडळातील सदस्य विसर्जनाच्या निमित्ताने बाप्पाच्या मूर्तीसह उतरले मात्र त्यातील ३ सदस्यांचा तोल सुटला व ते प्रवाहात वाहू लागले. विसर्जनाच्या स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांना कसेबसे वाचवले. मात्र प्रविण वनकर हा नदीत बुडाला. रात्रभर या तरुणाचा नदीत शोध घेण्यात आला मात्र प्रवीणचा पत्ता लागला नाही. त्यानंतर आज मंगळवारी या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
A youth who went to immerse Ganpati drowned in Erei river at Chandrapur