माणसाच्या राशीतीले उपद्रवी ग्रह
रामचंद्र सुतार सर
पत्रकार दै. सकाळ rysutaroo7@gmai.com
8888818631
💦💦💦💦
मी नेहमी प्रमाणे दै. सकाळ वाचत असताना नकळत माझं लक्ष 'दिनमान' मधील राशी भविष्याकडे गेलं. त्या दोन ओळीच्या भविष्यात.....
तूळ राशीला आज सतावणारे ग्रह अडचणी वाढतील. सावधानतेने पावलं टाका....
हे वाचलं आणि मन कसं खट्ट झालं. छळतात असे आकाशातील ग्रह तारे,ग्रह बोलले, कशाला आम्ही छळू तुम्हा अरे ,माणसा तुझ्याच मनीचे हे खेळ सारे
खरंच मानवी जीवन किती विचित्र असतं नाही ! तो ऊन सावलीचा खेळ आहे की सुख - दुःखाचा मेळ आहे. काही कळत नाही. नियती जसं नाचवेल तसं नाचायचं एवढंच माणसाच्या हाती असतं.
त्या नियतीच्या कपट नात नीती मुळेच की काय देव दर्शनाला जातानाच दुर्देवाने काही क्षणातच ते भविष्य तंतोतंत खरं ठरलं. अनपेक्षितपणे माझा एका बरोबर संघर्ष झाला. आणि तो वाद विकोपाला गेला. आतापर्यंत मला असं टाकून कोणीच बोललं नव्हतं. हेच अपमानाचं विषारी शल्य मनाला टोचत होतं.
मान सांगावा जनात
अपमान गिळावा मनात
पण कारणा शिवाय झालेला अन्याय मनात गिळणं माझ्या स्वभावातच नव्हतं. वाटलं त्याच्या कॉलरला धरुन त्याला चांगलाच जाब विचारावा. पण अचानक काही शिक्षक मित्र आल्याने दुर्दैवाने तोही नाद सोडावा लागला. नाविलाजाने मी त्या मित्रां सोबत मी घरी आलो. पण मन कसं बेचैन झालं होतं. कशातच लक्ष लागत नव्हतं. का कुणास ठाऊक अपराध त्या मानसाचा होता. पण राग मात्र त्या ग्रहांच्यावर होता. दिवस मावळला. रात्र झाली तरी तो सकाळचाच प्रसंग माझ्या मनात अक्षरशः पिंगा घालत होता. का कुणास ठाऊक हे सारं त्या ग्रहांच्या वक्रदृष्टीनेच झालं. असाच *माझाही ग्रह झाला होता* पण मला हे मात्र कळेना की कोणतंही कारण नसताना हे ग्रह माणसाच्या हात धुवून का पाठी लागतात ? कारण एखाद्याला कारणा शिवाय त्रास देणे हे काम केवळ माणूसच करु शकतो. नव्हे ती त्याची सहज प्रवृत्ती आहे. पण ती ग्रहांची कशी असणार ? याच शंकेनं मी बेजार झालो होतो. आणि त्याच बरोबर ग्रहांचं निरपराधीत्वही आपोआपच माझ्या समोर अधोरेखित होत होतं.
त्या मना विरुद्धच्या घटनेनं माझं मन सैरभैर झालं होतं. मनातून निराशेचा अंधार दाटून आला होता. त्यात बाहेरचा मिट्ट काळोख आणखीन भर घालत होता. मन थोडसं हलकं करावं म्हणून गॅलरीत आलो आणि सहज माझं लक्ष आकाशाकडं गेलं. O my God ! त्या निळ्याभोर आकाशातील लुकलुकणार्या तारकांचा तो अप्रतिम अथांग नजारा पाहून मन आश्चर्यानं आवाक् झालं. अत्यानंदानं मोहरुन गेलं. जणू आपल्या इवल्याशा लुकलुकण्याने त्या भिषण काळोखालाच भेदण्याचा अथक प्रयत्न करत होत्या. पण काळोख मात्र आपलं पाय रोवून ठाम होता. तरीही त्यां इवल्याशा तारकांचं लुकलुकणं काय थांबलं नव्हतं.... जणू काही
माणसानं कसं वाघा सारखं जगावं
संकटांना घाबरण्याचं काम नसावं
वादळं काय येतात आणि जातात
आपण मात्र आपल्या विचारांवर ठाम असावं
असं सुचवतच त्या चिमुकल्या तारका आपल्या विचारांवर ठाम होत्या. पण मी मात्र सकाळी घडलेल्या घटनेने कोलॅप्स झालो हो खरंच अथांग समुद्रात खवळलेली भयंकर वादळं येण्यापूर्वीच आपण सावध होतो. आणि होणाऱ्या गंभीर त्रासापासून आपण अलगद बाजूला होतो तसंच माणसाचं मन कळणारं एखादं यंत्र मिळालं असतं तर... माणसाच्या मनातली कपटी आणि सैतानी वादळं सुध्दा कळली असती माणसाला. या त्याच्या कपटी आणि तुसड्या मनामुळेच
माणूस कधी माणसाकडं
माणूस म्हणून वळला नाही
म्हणूनच त्याला माणसातला
माणूस कधी अजिबात कळला नाही
त्यामुळेच मनाला ओरबडणारे असे कटू प्रसंग अनेकांच्या वाट्याला येतात. आणि त्यात हळवी मानसं विनाकारण भरडली जातात.
या मानवी स्वभावात मन रेंगाळत असतानाच उपरोक्त चारोळीतच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माणसातलं चांगुलपण हरवल्या मुळेच तो भावनाशून्य रोबोट सारखं वागतो आहे. आणि भूतकाळातील निरागस, निष्पाप माणसांच्या आठवणीने मन व्याकुळ होतं आहे.
देवा परक्यालाही जीव लावणारं
ते माणसातलं मन कुठं आहे
इतरांच्या दुःखातही अश्रू ढाळणारं
त्याचं ते अनमोल धन कुठं आहे
हे अनमोल धन हरवल्यामुळेच त्याचं मन बधीर झालं आहे. म्हणूनच इतरांच्या दुःखात त्याला आसुरी आनंद मिळतो आहे. त्याला जसा आपल्यातला 'मी' कळला नाही तसा त्याला दुसऱ्यातला 'चांगला माणूस' ही कधीच कळला नाही
वि. स. खांडेकर म्हणायचे, "उत्तुंग आकाशात माणसाला पक्षा प्रमाणे उडता आलं. अथांग सागरात माशा प्रमाणे पोहता आलं. पण माणसाकडं माणूस म्हणून कधीच नाही बघता आलं.
नागुणी गणेशु वेत्ती
गुणी गुणेशु मत्सरी
या उक्ती प्रमाणे एखादा गुणवान अडाणी माणसाला कळत नाही. तर एक विद्वान दुसऱ्या विद्वानाचा नेहमीच मत्सर आल्याने त्याला त्यालाही तो कळत नाही. एकून काय माणसाला माणूसच कळला नाही हेच तर मानसाचे दुर्दैव आहे. आणि हीच खंत सकाळी घडलेल्या प्रसंगात लपली होती की काय कुणास ठाऊक ! माझ्या तूळ
राशीतलं ते कटू भविष्य क्षणार्धात कसं खरं ठरलं ! याचंच मला आश्चर्य वाटलं. कारण त्याच तूळ राशीत आज अचानक धनलाभ असं मी हजोरो वेळा वाचलं होतं. पण तसं मात्र कधीच घडलं नाही. माझी तशी अपेक्षाही नाही. कारण असे अनेक तळतळाट घरी घेऊन येणारं धन माझ्या स्वभावात कधीच बसलं नाही. त्यामुळे अपेक्षाभंगाचं दुःखही मला कधीच झालं नाही. मग राशीला सतावणारे हे ग्रह एका बाबतीत खरे ठरतात. तर दुसऱ्या बाबतीत ते का
खोटे ठरतात. म्हणूनच ग्रहांचं 'माणसाच्या राशीला लागणं' हे खरं की खोटं ? आणि खोटं मांनलं तर सकाळी वाचलेलं भविष्य तंतोतंत कसं खरं ठरलं ? आणि खरं मानलं तर *धन लाभाचं' भविष्य कसं खोटं ठरतं ? अशा अनेक शंकानी माझं मन अगदी सुन्न झालं.
म्हणून राशीतले ग्रह ही संकल्पनाच खोटी वाटली. मला तर हे अजिबात पटलं नाही. पाना आडून एखाद्या कळीनं हळुच डोकवावं तसं माझ्या मनात आणखी एक विचार डोकावून गेला की लाखो मैल दूर असणारे हे ग्रह आम्हाला दिसतात. पण मग आपण त्यांना दिसत असेन का ?
आणि लगेच माझं मन म्हणालं, अं हं अजिबात नाही ! या साय्रा भ्रामक कल्पना आहेत. तू शिक्षक आहेस. तुझ्या विद्यार्थ्यांना ग्रह-तार्यांचा भुगोल तू स्वतः शिकवला आहेस. त्यांचं अस्तित्व, त्यांचे स्वरुप, धगधगत्या लाव्हारसाचे स्वयंभू तारे आणि दगड मातीचे बनलेले हे ग्रह सारे ! हे सारं तुला माहित असूनही तुझ्या मनात असा विचार तरी कसा येतो ? तुझी लाडकी कन्या अबोलीच तुला एकदा म्हणाली होती. आठवतं का बघ !
दगडातले देव सारे
दगडाचेच असतात
ते ठणठणी कोरडेच असल्याने
भावना तर अजिबातच नसतात
मग त्यांना भावनाच नसतील तर त्यांचं माणसा सारखं चिडणं, रागावणं, हसणं, दुःखी होणं, सुखानं मोहरुन जाणं हे सारे मानवी आरोप त्यांच्यावर का करायचे ? रागवायला मन असावं लागतं. मग मनच नसेल तर त्यांची वक्रदृष्टी कशी होणार...? हे कसे शक्य आहे ? शिवाय त्यांच्यात आणि आपल्यात लाखो-करोडो मैलांचं अंतर. विश्वाच्या या अथांग पसाऱ्यात माणूस म्हणजे एक नगण्य जीव. मग अशा नगण्य जीवासाठी ते भावनांहीन ग्रह कसे काय उपद्रवी ठरतात ?
न दिसणाऱ्या माणसाच्या हात धुऊन का पाठी लागतात ? ज्यांच्या स्वप्नातही 'माणूस' नावाचा विचार नसेल त्या बाबत चांगला किंवा वाईट समज ते का करुन घेतात ?
माणूस परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती. पण तीच सर्वात वाईट निर्मिती हे ही त्यानं उत्तराखंड आणि माळीनचा प्रलय, प्रत्येक महापुरात बुडणारी शहरं , महिलांच्या वरील दररोजचे अत्याचार, कोरोना कळातील त्याची सैतानी कृत्ये, पर्यावरणाचा ह्रास, निसर्गाडी सोबतचा त्याचा कृतघ्नपणा, अंधश्रद्धेतून बालकांच्या होणाऱ्या हत्या, त्याच्या पापाचा हैदोस, जाणून बुजून एखाद्याला उध्वस्त करणं, त्याला आयुष्यातून उठवणं, चांगल्या माणसाला राजकारणातून हद्दपार करणं, त्याला बाजूला सारुन आपल्या पापाचं अधिराज्य चालवणं, किड्या मुंग्या सारखी माणस मारणं, जंगली प्राण्यांची हत्या, बेसुमार वृक्षतोड यातून तो गुन्हेगारी विश्वाचा शहेनशहा बनला आहे. परमेश्वराने सुद्धा पश्चातापाने अश्रू ढाळावेत इतका तो कृतघ्न वागतो आहे. म्हणूनच एखाद्या हिमनगा सारखं त्याचं खरं रुप अजूनही अजिबात कुणालाच कळलं नाही. पण मानूस नेहमी हे विसरुन जातो. की.....
गुन्हेगारी थोडा काळ
मनमुराद मौज करते
घडा पापाचा भरतानाच
नियतीच हिशेब त्याचा चुकता करते
जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच तुम्हाला परत येतं. तरीही तो दुसऱ्याच्या राशीतले उपद्रवी ग्रह बनून, बिनबुडाचे नको तेवढे ग्रह करुन त्याच्याशी उभं वैैर करतो. त्याच्या हात धुवून पाटी लागतो. पण जो दुसऱ्याचं वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही. कारण नियती नेहमी प्रत्येकाचा हिशेब चुकता करत असते. तरीही याच उपद्रवी ग्रहानी दिलेल्या भयंकर यातनांतून आज प्रत्येक मानूस पोळतो आहे. दुःखाने आतल्या आत जळतो आहे.
ज्योत जळते जगासाठी
त्यातच तिचे सुख आहे
पण तिची कुणाला तमा नाही
हेच तिचं दुःख आहे
आज समाजाची त्या ज्योती सारखीच अवस्था आहे. आपल्या सुवर्ण भूतकाळात आणि दैदिप्यमान इतिहासातही अनेक युगपुरुष होऊन गेले. आणि आजही आहेत. पण या उपद्रवी ग्रहानी त्यांना तरी कुठं ढिलं सोडलं होत !
जगाच्या कल्याणा
संताच्या विभूती
जणू इतरांच्या सुखा साठी जन्मलेल्या या महात्म्याना स्वतःचं असं जगणंच नव्हतं आणि नाही.
आम्ही राजे कुठले
आम्ही तो जनतेचे सेवक
या वात्सल्य भावनेने राजा असूनही सामान्य जीवन जगणारे, रयते साठी आयुष्यभर मोंगलांशी संघर्ष करणारे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बुडती हे जन देखवेना डोळ म्हणून स्वतःचा संसार वाऱ्यावर सोडून आयुष्यभर जगाच्या संसारा साठी चंदना सारखे झिजणारे तुकाराम महाराज
कर्मण्ये वाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन्
या भगवद् गीतेतील उक्ती नुसार समाजाने अनंत यातना देऊनही त्यांच्याच सुखासाठी
आमचा पेला दुःखाचा
डोळे मिटूनी प्यायाचा
या सोशिकतिने तिरस्काराचं विष सुद्धा गटागटा पिणारे ज्ञानेश्वर माऊली.
स्त्री शिक्षणासाठी आपलं उभं आयुष्य करपून टाकणारे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले आपल्या दलित बांधवांसाठी स्वतःचे सुख मातीत गाडून आयुष्यभर दलिततेतर समाजाशी संघर्ष करणारे भारतरत्नं बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्या साठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे आणि हसत हसत फासावर जाणारे हजारो स्वातंत्र्य सेनानी अशा अनमोल रत्नांना तरी त्यानी कुठे सुखानं जगू दिलं होतं ? पण जग किती वाईट असलं तरी त्यात थोडं चांगलंही असत. आणि त्या चांगल्यासाठीच हे जग चालत असतं. म्हणूनच तर दुःख कितीही अनावर झालं तरी ते घटाघटा पितच आपल्या समाजसेवेचं असिधाराव्रत त्यांनी चालू ठेवलं होतं.
दुःख कुणाला सांगू नका
सुख कुणापुढे पसरु नका
लोक सुखाचा द्वेष तर दुःखावर
मीठ चोळतात हे कधी विसरु नका
पण तरीही कुणा समोर व्यक्त नाही झालो तर आपलं मन लाव्हा रसा सारखं आतल्या आत धुमसत राहत. ते रक्तबंबाळ होतं. जसं एखाद्या महाकाय धरणाच्या अतिरिक्त पाण्याला मोकळी वाट मिळाली नाही तर ते भक्कम धरणही फुटून जातं. मनाचंही नेमकं तसंच आहे. तानतणाव आणि दुःखाला मोकळं केलं नाही तर आपलं जगणंच उध्वस्त होतं. कारण समुद्रातल्या वादळा पेक्षा मनातली वादळं भयंकर असतात. म्हणूनच प्रत्येकानं आपल्या मानसा जवळ व्यक्त होणं केव्हाही चांगलं. चुकूनही ते मनात साचवू नका. हे दुःख ग्रहांचं नाही तर माणसानं माणसाला दिलेल्या यातना आहेत. हे समजून घ्या.
खरं तर माणसाच्या राशीत ग्रह कधीच नसतात. आणि वाईट तर अजिबात नसतात. माणसानेच रचलेलं ते एक अजब षडयंत्र आहे. याच निर्दयी उपद्रवी ग्रहांनी तर हजारोंची शिकार केली आहे. त्याच शिकारीतलाच मी एक बळी. माझ्या राशीला लागलेल्या या ग्रहानीच माझं आयुष्य उध्वस्त केलं आहे. तो वाईटाने चांगुलपणाचा केलेला घात आहे. कारणा शिवाय उगवलेला सूड आहे.
आज माझ्या जीवनात मित्रांच्या पेक्षा शत्रूंचीच संख्या जास्त आहे. आणि तीही या माणसातल्या उपद्रवी ग्रहांच्या मुळेच.
माझेच मित्र सारे
मलाच शोषणारे
मित्रत्व सांगताना
शत्रुत्व पोसणारे
ज्याना मी माझ्या निरागस मित्रांची पवित्र मांदियाळी मानत होतो. माझं अनमोल धन समजत होतो. ते माझे मित्र नव्हते तर गोड बोलून माझे जीवन उध्वस्त करणारे रानटी सैतान होते हेच मला कळल नाही. त्यांच्या कपटी निरागसते खाली लपलेल्या दुर्जनतेवर डोळे झाकून विश्वास ठेवला हेच माझं चुकलं होतं.
दुर्जना प्रिय वादीच
नैतद विश्वास कारणम्
मधु तिष्ठति जिव्हाग्रे
हृदये तू हलाहलम्
या संस्कृत श्लोका नुसार वाईट माणसाच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका. कारण त्यांच्या ओठांत मध असला तरी पोटात खचाखच विषच भरलेलं असतं. हेच मी विसरलो होतो. आणि त्यामुळे तर मी ताण-तणावांचा विषारी महासागरात अक्षरशः गुदमरतो आहे. त्यांच्या गोड बोलण्याला फसल्या मुळेच मला त्यांच्या पोटातलं विष कधी कळलंच नाही.
म्हणूनच तर वरुन गोड बोलून आतून पोकरणारे आणि आयुष्यभराची भाकरी देणाय्रालाच ठोकरणारे, उपकारालाच पायदळी तुडवणारे माझे अनेक जिवाभावाचे मित्र आज माझे नंबर वन शत्रू बनले आहेत. केवळ मित्रच नव्हे तर त्यात पै - पाव्हणे, अगदी रक्तातले खोल घरापर्यंतचे नातेवाईक सुध्दा त्यात मागे नाहीत. तेही आज माझ्या समोर शत्रूच्याच रांगेत उभे आहेत.
पण खरं सांगायचं तर चूक त्यांची नाही माझीच आहे. too good is too bad या न्यायाने माझ्या अती चांगुलपणानेच मला दिलेल्या त्या रक्तबंबाळ जखमा आहेत.
जखम त्यानी खोल दिल्याने
यातना त्याच्या छळताहेत
दुर्देवाने मैत्रीतले अनाजीपंत
मला खूप उशीरा कळताहेत
मैत्रीतल्या या अनाजीपंताना वेळीच ओळखून थोडं दूर राहिलो असतो, त्यांचं चांगलं न करता तथास्तू राहिलो असतो तर कदाचित आजही ते माझे मित्रच असते. पण माझा अतिउत्साह आणि अती चांगुलपणाच शेवटी मला भयंकर शाप ठरला.
खरं तर चांगल्या माणसा मध्ये नेहमीच एक वाईट गोष्ट असते. तो नेहमी सर्वांना चांगलं सामजतो आणि पुढे आयुष्यभर अडचणीतच ठेचा खातो* म्हणूनच तर दुःखाने व्याकुळ झालेले मन अक्षरशः भळभळतं आहे.
आयुष्यात असं कोणी भेटलं नाही
ज्यानं मला छळलं नाही
चांगुलपणही असं का तुडवलं जातं
हे अजूनही मला कळनलं नाही
पण मी त्याचा अजिबात विचार करत नाही. आणि घाबरत तर मुळीच नाही. कारण कुणालाही न मेचणारा, कणखर, निर्भिड, बोलका पारदर्शी स्वभाव ही माझ्या विठ्ठलानं मला दिलेली एक नॅचरल गिफ्ट आहे. आणि तिच माझी अनमोल संपत्ती आहे.
पण स्वभाव कसाही असला तरी माणसं ओळखणाराच सुखानं जगू शकतो हे आता मला माझ्या कटू अनुभवातून पटलं आहे. म्हणून मानसं ओळखूनच अशा उपद्रवी ग्रहा पासून दूर रहायला हवं. पण एक, तुम्ही जर कशात मिंधे नसाल तर जगाची पर्वा करु नका. नाही तर जगणं कठीण होईल. यातना देणारा कितीही भयंकर असला तरी तो भयंकर आघात सोसणाय्रा मनाचा तळतळाट हा त्याहून भयंकर असतो त्यामुळे पापी नराधम आपोआपच उध्वस्त होतो. ही अंधश्रद्धा नाही. तो धगधगता, जळजळता वास्तववाद आहे. कारण मानवी मनाचा तळतळाट तळतळाट हा अणुबॉंम्ब पेक्षाही भयानक असतो. पूर्वी हा तळतळाट शाप म्हणून प्रचलित होता म्हणून चुकूनही कोणाचा तळतळाट मात्र अजिबात घेऊ नका.
नेहमी 'मी कोण' या पेक्षा 'मी कसा' आहे याला महत्त्व द्या. कारण समाज नेहमी तुम्ही कसे दिसता या पेक्षा 'तुम्ही कसे वागता' याला महत्त्व देतो. एवढं करुनही हे मानवी ग्रह तुम्हाला पिडणारच. पण काळजी करु नका. कारण *वाईटाला सुद्धा एक दिवस भयंकर वाईट शेवट असतो यावर विश्वास ठेवा.
चांगुलपण वाटणाय्राची ओंजळ कधी वाया जात नसते याच संस्कारातून कुणाचेही चांगलं व्हावं हेच 'वेड माझ्या अंगलट आलं. म्हणूनच एकाच्या भल्यासाठी मी दुसऱ्याचा वाईट झालो आणि ज्याच्या साठी वाईट झालो तोही उलटल्याने दोघांचाही शत्रू झालो. आणि आज असे अनेक शत्रू करुन बसलो. तेही स्वतः साठी नव्हे केवळ इतरांच्या भल्यासाठी.
पण खरं सांगू ! मी जगात फक्त तीन शक्तीना घाबरतो. पहिली विठ्ठल - रखुमाई आणि स्वामी समर्थ, दुसरी मी उरीपोटी जपलेलं माझ्या शिक्षणाने दिलेले अनमोल संस्कार आणि तिसरी शक्ती म्हणजे माझं सर्वस्व माझी लाडकी कन्या अबोली.
अबोलीच्या डोळ्यात पाणी येईल
असं कधी मी वागणार नाही
कारण या अनमोल अश्रूंची किंमत
टाटा बिर्ला ही करु शकणार नाही
पहिल्या शक्तीला सर्वकाही दिसतं ही भिती. दुसऱ्या शक्तीत संस्कार तुडवले जाण्याची भीती आणि तर 'असं केलं तर' माझ्या अबोलीला काय वाटेल ? ही तिसरी भिती. O my God ! या तिसर्या भीतीचीच भिती एवढी की मी त्याची कल्पनाच करु शकत नाही. याच भीतीमुळे मनातला कोणताही वाईट विचार अथवा मोह आपोआपच गळून पडतो. धुक्या सारखा विरुन जातो.
आणि अबोलीच्या अश्रूंना जीवापाड जपणं हेच तर माझ्या सुरक्षेचं अभेद्य कवच आहे. आणि माझ्या चांगुलपणाचंही गुपित आहे. आज मी जो कोणी आहे. तो या तीन शक्ती मुळेच. म्हणूनच माझ्या ओटांच्या पाकळ्यांतून हळुवार अनमोल मोती घरंगळतात...
जगायचं आहे निर्भिड मला
मी तसाच जगणार आहे
कुणीही कितीही वाईट केलं तरी
मी माझा चांगुलपणाच जपणार आहे.......... ✒️
(या लेखातील सर्व चारोळी
अबोली चारोळी संग्रहातील आहेत)
💦💦💦💦