काही व्यक्तींना जीवनात प्रत्यक्ष अनुभवने ही नक्कीच एक पर्वणी असते. अशा व्यक्ती आपले जीवन सर्वांगाने समृद्ध बनवितात आणि काळाच्या ओघात नाईलाजाने दूर जात इतरांसाठी दीपस्तंभ बनून राहतात. मी अनुभवलेल्या व्यक्तींपैकी अशीच एक महनीय व्यक्ती म्हणजे स्वर्गीय श्री विलासराव तांबे सर. माझा आदरणीय विलास सरांसोबतचा रचनात्मक तसेच संघटनात्मक कार्यातील सहभाग आणि सहवास हा खरोखरच मन सुखावणारा असाच होता. आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, उत्कृष्ट पत्रकार, समाजकारणी व राजकारणी, म्हणून सर सदैव ओळखले जातील.
दोन सप्टेंबर हा दिवस आदरणीय विलासराव तांबे सरांचा जन्मदिवस फार दिवसापासून बालिका दिन म्हणून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ साजरा करते. वारकरी परंपरा जोपासणाऱ्या तांबे कुटुंबीयांमध्ये सरांचा जन्म झाला. सरांच्या वडिलांचे ओतूर गावातील बाजारपेठेत खत औषधांचे दुकान होते. त्यांनी शालेय जीवनात वडिलांबरोबर दुकानदारी सांभाळून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ओतूर येथे पूर्ण केले व पुढे मुंबईत नोकरी करून शिक्षण शास्त्रातील पदविका मिळविली.
आदरणीय कै. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या राजकीय कारकिर्दीत विलासरावांचा फार मोठा सहभाग होता. त्याकाळी युवक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण जुन्नर तालुक्याला झाली. राजकीय नेत्यांमध्ये ऊठबस सुरू होऊन राजकारणाचे बाळकडू येथेच त्यांना मिळाले. दरम्यानच्या काळात ग्राम विकास मंडळ ओतूर येथे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक होऊन आदरणीय कै. लताबाई श्रीकृष्ण तांबे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. या निवडणुकीत सरांचे फार मोठे योगदान होते. निवडणुकीनंतरही सर लताताईंबरोबर सावली प्रमाणे उभे राहिले.
हायस्कूलमध्ये सर इतिहास हा विषय विद्यार्थ्यांना शिकवीत. आजही अनेक त्यांचे विद्यार्थी ह्या गोष्टीची आठवण काढतात. सरांनी शिकवलेला हिटलर आणि अनेक ऐतिहासिक पात्रे आजही मनातून जात नाहीत. जगात झालेल्या सर्व राजकीय उलथापालथी यांवरील त्यांची व्याख्याने मुलांना फार भावत असत.
शिक्षकी पेशात सरांचे नंतरच्या काळात मन रमेना. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्यांनी मग राजकारण, समाजकारणात उडी घेतली. व्यापार-उदीम सुरू केला. दरम्यानच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहिले. नीलम टाइल्स या नावाने उद्योग सुरू केला. त्याकाळी शहरापर्यंत गृह प्रकल्पांना टाइल्स त्यांच्याकडून पुरविली जाई.
शेतीची आवड असल्याकारणाने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सुरुवातीपासून त्यांनी अवलंबले. त्यांनी केलेली आल्याची शेती व तिचे विक्री व्यवस्थापन अजूनही आठवते. ऊस ,केळी या पिकांचे उत्कृष्ट नियोजन करून त्याकाळी चांगले अर्थार्जन केले. दरम्यानच्या काळात सरांना अपघात झाला व त्यांना बराच काळ अंथरूणावर खिळून राहावे लागले. या काळात सरांनी प्रचंड वाचन व लिखाण केले.
जगद्गुरुंनाही गुरूमंत्र देणारी आपली पुण्यभूमी आणि याच भूमीचे पाईक असणाऱ्या विलास सरांनी शिक्षण हेच तळागाळातील समाजाच्या उद्धाराचे एकमेव साधन आहे, हे ओळखून पावले उचलली. मुलींसाठी एक आदर्श शाळा सुरु करण्याचे स्वप्न सरांच्या अनेक दिवस मनात होते. त्यात त्याकाळी अनेक मुली प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाकडे जायला टाळत. दळणवळणाची विशेष साधने नव्हती. मुलींसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण हे ध्येय उराशी बाळगून मुलींसाठी निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरांनी घेतला. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय या नावाने मुलींसाठीची पहिली शाळा व वसतिगृह ओतूरमध्ये सरांनी सुरू केले. मुस्लिम समाजातील, मागासवर्गीय समाजातील मुली शाळेत येऊ लागल्या. या शाळेत सुरुवातीला कमी मुली होत्या. हळू हळू शाळेत अठरापगड समाजातील मुलींची संख्या वाढू लागली. सरांच्या शाळेत शिकून गेलेल्या मुलींनी त्यांना पाठवलेल्या अनेक पत्रातून सरांचे आभार व्यक्त केलेली पत्रे "सावित्रीच्या लेकी" या पुस्तकात आपणास वाचायला मिळतात.
पुढे जाऊन सरांनी संस्थेचा फार मोठा विस्तार केला व शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने ओतूर परिसरात आणि पुणे जिल्ह्यात आणली. एकविसाव्या शतकात ज्ञान हीच माणसाची संपत्ती आणि भांडवल असणार या दृष्टीकोनातून तंत्रशिक्षणाचे एक नवे दालन सरांनी पुणे जिल्ह्यात उभे केले. त्यातून घडलेला बदल आज आपल्या डोळ्यासमोर आहे.
सरांना पर्यटनाची फार आवड होती. आपल्या व्यस्त काळातही वेळ काढून इस्त्राईल, युरोप, चीन या देशांना भेटी दिल्या. वाचन, लेखनाची प्रचंड आवड असल्याकारणाने त्यांनी ज्ञानविलास या नावाने साप्ताहिक सुरु केले. सर यातून संपादकीय लेख लिहित. त्यांचे अनेक संपादकीय लेख अजूनही आठवणीत आहेत. आपल्या कामाच्या मोठ्या व्यापातही सर भल्या पहाटे उठून लेखन करून ज्ञानविलास हे साप्ताहिक वाचकांसाठी नियमितपणे प्रकाशित करीत असत.
सरांचे आदरणीय श्री शरदराव पवार साहेबांवर नितांत प्रेम होते. सरांबरोबर पवार साहेबांना भेटण्याची आम्हा मंडळींना अनेक वेळा संधी मिळाली.
सरांच्या अपघाताच्या वेळी सरांना पुरविलेल्या रक्तातून त्यांना काविळची बाधा झाली. त्यामुळे सरांना आजाराशी फार मोठा संघर्ष करावा लागला. परंतु त्याची तमा न करता त्यांनी आपले शैक्षणिक कार्य जोमाने सुरू ठेवले. सरांची मुले त्याकाळी शिकत होती. मोठा मुलगा विशाल, वैभव व मुलगी वृषाली हे तिघे शिक्षण घेत होते. सरांच्या आजाराच्या काळात या तिघांवर आणि निलम ताईंवर संस्थेची मोठी जबाबदारी आली व त्यांनी ती समर्थपणे पेलली. शेतीची संपूर्ण जबाबदारी आदरणीय नीलम ताईंनी सांभाळून कुटुंबाला खऱ्या अर्थाने ऊर्जितावस्थेत ठेवले.
सरांच्या या शैक्षणिक विकासाच्या वाटचालीत आम्हा सर्व सहकाऱ्यांना थोडासा भाग घेता आला हे आमचे आम्ही परमभाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात सरांसोबत आम्ही शेवटपर्यंत राहिलो. त्यात श्रीहरी तांबे, श्री कारभारी औटी सर, कै. गुलाब अण्णा डुंबरे, शांताराम बापू घोलप, बाळासाहेब हरकू डुंबरे आणि अनेक अशी नावे घेता येतील.
विलास सरांच्या प्रयत्नातून हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानरूपी सुगंध दरवळला, दरवळतो आहे आणि दरवळत राहील. पैसा, संपत्ती, सत्ता, साधने ही जीवनाच्या सर्व अंगानां एकाच वेळी व्यापून राहत नाहीत. मात्र ज्ञानाचा सुगंध हा जिवनातील प्रत्येक क्षेत्रात एकाच वेळी व्यापून राहतो. असा हा ज्ञानरूपी सुगंध समाजात निर्माण करण्याचे पवित्र काम सरांनी आपल्या आयुष्यात केले आणि हे ब्रीद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले.
सरांच्या सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि राजकीय विचारांचा वारसा समर्थपणे पुढची पिढी सांभाळत असताना त्यांनी सरांच्या सहकार्यांचे कृतज्ञ भावनेने ठेवलेले स्मरण निश्चितच आनंददायी आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात वेगवेगळ्या आठवणींचे वेगवेगळे कप्पे असतात. मग त्या आठवणी व्यक्तींच्या असतात, स्थळांच्या असतात, बहुविध घटनांच्या असतात. प्रत्येक कप्प्यातल्या आठवणींना स्वतःचा विशेष असा एक लहेजा असतो. प्रसंगानुरूप एखाद्या निवांत क्षणी आठवणींचा एखादा कप्पा हलकेच उघडायचा अन् त्यात खूप खोलवर जाऊन सुखदुःखाच्या क्षणांचा धांडोळा घेत पुन्हा वर्तमानात यायचं... एक वेगळीच अनुभूती असते यात. माझ्या आठवणींच्या या कप्प्यांमध्ये विलास सरांचां एक विशेष कप्पा आहे. तो कप्पा सोनेरी आहे, आनंदाने भरलेला आहे. ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्काराच्या निमित्ताने हा आठवणींचा सोनेरी कप्पा पुन्हा उघडल्याबद्दल मी तांबे कुटुंबियांचा आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराचा मनपूर्वक आभारी आहे.
श्री भास्कर पोपटराव डुंबरे, चैतन्य मेडिकल, ओतूर