खरीप आढावा बैठकीत आत्मा चंद्रपूर वेबसाईटचे लोकार्पण
चंद्रपूर दि.10- बियाणे संदर्भातील आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. खरीप हंगामासाठी एकूण 93 हजार 29 क्विंटल बियाणाची आवश्यकता असून सद्या 34 हजार 890 क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. या खरीप हंगामासाठी 84 हजार 400 मे.टन खताचे आवंटन असून सध्या 24 हजार 541 मे.टन खताचा साठा शिल्लक आहे. या वर्षी खताची टंचाई भासणार नाही अशी ग्वाही कृषी विभागाने दिली. खताच्या लिंकिंगला प्रतीबंध घाला असे निर्देश देवतळे यांनी दिले. माणिकगड येथे बियाणाचा रॅकपांईट लावण्याची सुचना खासदार हंसराज अहिर यांनी मांडली असता या संदर्भातील प्रस्ताव तात्काळ पाठविण्याचे निर्देश देवतळे यांनी कृषी विभागाला दिले.
हवामानाच्या अंदाजानुसार या वर्षी पावसाचे अनुमान चांगले असून खरीप हंगामात बियाणे व खते योग्यवेळी शेतक-यांना मिळतील याचे नियोजन करा असे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, खासदार हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनंगटीवार, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, कृषी सभापती अरुण निमजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.डहाळकर, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील, कृषी सहसंचालक डॉ.जे.सी.भुतडा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.व्ही.के.मानकर व विविध विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
बियाण्याचा तुटवडा भासणार नाही असे कृषी विभागाने सांगितले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, शेतक-यांना बियाणे वेळेवर देण्याची व्यवस्था करावी सोबतच बियाणाचा दर्जा योग्य असल्याचे तपासून घ्यावे.
कृषी पंपाच्या जोडणीबाबतचा आढावा घेतांना 31 मे पर्यंत पेडपेंडींग जोडण्या पूर्ण कराव्यात व त्याचा दर आठवडयाला आढावा जिल्हाधिकारी यांना सादर करावा असे निर्देश विद्युत वितरण कंपनीला त्यांनी दिले. या वर्षी मान्सुन चांगला असल्यामुळे शेतमालांचे उत्पादन वाढून शेतक-यांच्या चेह-यावर हास्य फुलेल असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत खासदार हंसराज अहिर व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खत, बियाणे, सिंचन, विज कनेक्शन व विमा योजना या विषयावरील नागरीकांच्या समस्या मांडल्या.
पिक कर्जा संदर्भात बोलतांना देवतळे म्हणाले की, पिक कर्ज वेळेत वितरीत करा तसेच शेतक-यांना किसान क्रेडीट कार्ड पूर्णपणे वितरीत होतील याची दक्षता घ्या. सिंचनाबाबतचा आढावा घेतांना पालकमंत्री यांनी सिंचन वाढविण्यासाठी माजी मालगुजारी तलावाची दुरुस्ती व गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घ्या अशा सूचना जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आत्मा चंद्रपूर या वेबसाईटचे लोकार्पण पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी कृषी विभागाचे सादरीकरण केले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 0000