राजकारणाला भ्रष्टाचार, गुन्हेगारी, धार्मिकतेची कीड लागली. त्यात खोटी आश्वासनं, दिशाभूलीची जोड. या विरोधात जनमानस तयार करावे लागेल. बोलावे लागेल. कीड साफ करावी लागेल. भाजपचे चुकते आहे. घोडचूक सुरु आहे. सत्तेच्या मुखवट्यातून धर्मप्रचार. हे लोकशाही शुचितेचे उल्लंघन. खूशाल धर्म प्रचार करा. ते स्वातंत्र्य आहे. त्यासाठी सांधू, संत, सन्याशी बना. इथं उलटं चालू आहे. साधू, सन्याशींना सत्तेत आणलं जातं. उमा भारती, साक्षी महाराज, योगी, पद्ना ठाकूर. हे धर्म प्रचारकांचे राजकारण खटकणारे. लोकशाहीला घातक. लोकशाही हवी. ती प्रगल्भ असावी. ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. ते प्रखर राष्ट्रवादी होते. इतरांकडूनही तिच अपेक्षा. त्यांच्या दृष्टीने राष्ट्रवाद अग्रणी. धर्म वैयक्तीक जीवनात आचरणाचा भाग. त्याला सार्वजनिक जीवनात स्थान नकोच. संविधानाने लोकशाही रूजेल. धर्मसत्ता, जातसत्ता संपेल. माणूसपणा जागेल. राष्ट्रभावना वाढेल.अधिक वृध्दीगत होईल. त्यातून राष्ट्र घडेल. ही संकल्पना होती. तिला खतपाणी देण्याचे काम अनेकांनी केले. त्यामुळे लोकशाहीचा डोलारा शाबूत आहे. अलिकडे त्याला धक्के बसत आहेत. मोदी काळात धर्माचे अवास्तव स्तोम आहे. घुसखोरी आहे. एककाळ होता. सरकारी निधी धार्मिक स्थळाला दिला जात नव्हता. त्यात पळवाट शोधली. धार्मिक स्थळाला लागून समाजमंदिर, सभागृह बांधण्याचे खूळ आलं. काही दिवसांनी ते बांधकाम त्या स्थळाचे भाग झाले. हे पतन वाढत गेले. लेखासंहितेकडे कानाडोळा झाला.
मैत्रीभावाचा अभाव
जुना काळ होता.गांधी, नेहरू, वाजपेयींचा. त्या पिढीच्या राजकारणात मैत्रीभाव होता. भाषा संयमी होती. अलिकडे गुजरात मेड राजकारण आलं. राजकारणाच रंगच पालटलं. भाषा बदलली. गोली मारोची भाषा वापरणाऱ्यांना मंत्रीपदाची बक्षिसी. पश्चिम बंगालमधील एकाला केंद्रात मंत्रीपद. अनेक गंभीर गुन्हे असताना गृहराज्यमंत्री पद बहाल. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राजकारण्यांवरील परस्पर गुन्हे काढले. स्वत:वरील गुन्हे माफ करण्याचाही प्रताप केला. असे प्रकार अनेक राज्यात घडले. न्यायालयाने आता बडगा उचलला. या अगोदर न्यायव्यस्था केवळ बघत बसली. कर्तव्यात चुकली. प्रगल्भ लोकशाहीत न्यायव्यवस्था निष्पक्ष व स्वतंत्र असावी. तेवढीच ती जागृत हवी. मागील दोन दशकात ती कणाहीन होती. त्यातून लोकशाहीत बरेच काही विपरित घडले.
शुचिता संपली...
वर्तमानात जे चित्र आहे. ते सत्तेत असणारे साव. विरोधी पक्षात असणारे गुन्हेगार. रोज सीबीआय, ईडी धाडी पडतात. बहुतेक सर्वच विरोधी पक्षात असणाऱ्यांकडे. असे कसे व्हावे. हा अनेकांच्या मनातील मोठा प्रश्न. वाशिंग मशीन ,डिटंर्जन्ट पावडर हे सफाईशी संबधित.हे शब्द राजकारणात आले. राजकीय अ:धपतनाला टोले लावणारे ठरले. कालपर्यंत विरोधी पक्षात असताना. शिव्यांचा धनी होता. पाला बदलताच पवित्र झाला. हे कोणते राजकारण. जनाची नाही. मनाची तरी काही असावी. नाहीतर ' मन की बात 'ला अर्थ काय..! हे सगळं चालू आहे. मग राजकीय शुचिता कुठे आहे.
विरोधी पक्ष हवाच...
प्रगल्भ लोकशाहीत विरोधी पक्षही महत्त्वाचा. सत्ताधारी पक्षा एवढेच त्याचे महत्त्व. तरी भाजपने कॉंग्रेसमुक्त भारतचा नारा लावला. हे लोकशाही देशात कसे चालेल. त्याचा अर्थ तुम्हाला लोकशाही मान्य नाही. असं काढावयाचं काय. संसदेत मतविभाजनाची मागणी होत असताना. दुर्लक्ष करणे. विरोधकांना डावलून कायदे करणे. एकाद्या वेळचे समजता येईल. त्याची पुनरावृत्ती होत असेल. तर चिंतेचा विषय ठरतो. राज्यसभेने ते अनुभवले. तिला अलोकशाही म्हणावे की संकुचित लोकशाही. राजकारणात धर्माचे स्तोम वाढले. नागरिकत्व देताना धर्माचा आधार घेतला. मग धर्मनिरपेक्ष देश कसा...! निवडणूक प्रचारात मंदिर अजेंडा होत असेल. पीएमचे मंदिरात लोटांगण असेल. यास धर्माचे सार्वजनिक प्रदर्शन नाही तर काय म्हणाल. हे नाकबूल कसे कराल. लोकशाहीत काही राजकीय संभ्यता असते. ती जपली पाहिजे. ती सोडून कसे चालेल. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जयश्रीरामचा नारा . तो सर्रास दिला जातो. तरी निवडणूक आयुक्त गप्प बसत असेल. दोघांवर नजर ठेवणारी न्यायव्यवस्था. ती सुध्दा दखल घेत नसेल. तर कायद्याचे राज्य आहे कसं म्हणाल..! लोकशाही टिकविण्यास. ती अधिक मजबूत करण्यास.तिला अधिक प्रगल्भ करण्यास उभ्या केलेल्या संस्था. ज्या स्वयंभू आहेत. त्या कर्तव्यात कसूर करू लागल्या. एकदा नाही तर वारंवार करू लागल्या. तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकतो. हे सद्दृढ लोकशाहीचे लक्षण नव्हे. या संस्थांनी लोकशाहीची बूज राखावी. राष्ट्रीय बाणा जपावा. पक्षीय बटीक बनू नये. त्यांचे जागृत राहणे. लोकशाही बळकटीचे लक्षण ठरेल. हे विसरून कसे चालेल.
धमकीबाज भाषा...!
देशात कारवाय्या आणि भाषा दोन्ही वादग्रस्त ठरल्या. बेछुट भाषेसाठी केंद्रीय मंत्र्याला अटक होते. ही अटक पुरोगामी महाराष्ट्रात घडणं भूषणावह नाही. चुकलं कोणाचं. हा वादाचा विषय. मात्र हे घडलं. लोकांनी ते बघितलं. या महाराष्ट्रानं अनेक दशकं बघितली. शरद पवार, वसंतदादा पाटील, मधुकरराव चौधरी, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे ,राजाभाऊ खोब्रागडे, रा.सु.गवई, सुमतीबाई सुकळीकर, नितीन गडकरी, महादेवराव शिवणकर, पांडूरंग फुडकर , शोभाताई फडणवीस, ना.सी. फरांदे ,अरुण गुजराथी सारखे नेते बघितले. ठाकरे, मुंडे, महाजन सभा गाजवित.विरोधकांना शब्दांनी बडवित. चिमटे काढीत. मात्र मर्यादा सोडली नाही. ठाकरीभाषा खटकत होती. तरी कटूता दिसली नाही. ती कटूता अलिकडे दिसते. जे सुधीर मुनगंटीवार दोन हजारच्या दशकात नरेश पुगलियांना घुस्सा क्यू आता है म्हणत होते. त्या मुनगंटीवारांचे बोलणे बघा. मग ते सभागृहातील असेल किंवा वृत्त वाहिनीवर .दुसरा वारही त्याच मार्गावर. दोघांचे धमकीयुक्त स्वर निघतात.चंद्रकांत पाटील, फडणवीसांचेही तसेच. तुम्ही युपाखाली 16 जणांना डांबले. सर्व सुसंस्कृत. वय झालेले.अनेकांची पाच- सात वैचारिक पुस्तकं बाजारात . लेखक , साहित्यिक, वकिल, सामाजिक कार्यकर्ते आहेत. तीन वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यातील स्वामी स्टेनचा बळी गेला. त्यांची मुलंबाळ चांगलाच आशीर्वाद देत असतील.अशाच गुन्ह्यात गुजरातमधील 120 पैकी 90 जणांना कोर्टाने निर्दोष सोडले. एकाने तर पुस्तकच काढले. दोष नसताना किती वर्ष जेलमध्ये डांबले. लोकशाहीत हे अपेक्षित नाही. या उलट भोंगाळे वाजविण्याची भाषा करणारे नितीन गडकरीं वरमले. नेहरू-वाजपेयींच्या सन्मानाची भाषा बोलतात. गुजरातमेड राजकारण वेगळेच दिसते. सध्या ते देशावर हावी आहे. त्याच्या आहारी अनेक गेलेत. त्यांच्या बोलण्यात दर्प आहे. त्यांना क्रोधबाज, कटबाज, धमकीबाज, खोटबाज, छापेबाज की आणखी काही म्हणा. ते निरीक्षणातून ठरवा.
छापेबाज राजकारण...!
राज्याच्या राजकारणात विरोधकांना जीवनातून उठविण्याचा खेळ चालू आहे. त्यांची सामान्याना शिसारी येते. धमकीबाज किंवा दुसऱ्यांवर दगड मारणारे धुतल्या तांदळाचे आहेत काय. त्याचे उत्तर नाही असेच आहे. दोन-तीन दशकापूर्वी स्कूटरने फिरत होते. त्यांच्याकडे पाच-सात किंमती गाड्या. हेलिकॅप्टर किंवा विमानातून फिरण्यासाठी पैसा आला कोठून. दिसणारा पैसा व छुपा पैसा वेगवेगळा.तरी सज्जनतेचा आव. संगळच वाईट केलं असंही नाही. काही चागलंही केलं असेल.पण बटबटीत दिसतं. ते वेदनादायक आहे. तुमच्या कारवाय्यातून सामान्याचा फायदा काय. तो बेकारीने बेजार आहे. महागाईत भरडला आहे. खोट्या आश्वासनांना विटला आहे. त्याचं जगणं कठिण झालं आहे. मुलांबाळांना शिकवू शकत नाही. वृध्दांवर उपचार करु शकत नाही. त्याचे जगणं महागलं. त्यावर उपाय हवा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीतून परिवर्तन हवं होतं. संविधानाच्या आधारे. राजसत्तेच्या माध्यमातून धर्मसत्ता, जातसत्ता संपावी. त्या दिशेने राजकारण्यांची कृती हवी. ही अपेक्षा होती. त्यासाठी हिंसाचार नको. शांतीचा मार्ग हवा. वर्तमानात उलट आहे. त्यात मॉब लिचिंग, घर वापसीच्या वल्गना. धर्मावर आधारित लव्ह जिहाद, नागरिकत्व कायदे हे चुकीचे. ते हिंसाचाराला खतपाणी देणारे. तीन कृषी कायदे त्याच माळेतील. चर्चेविना दहा मिनिटात एक विधेयक. या गतीने संमत झालेली विधयकेही तसेच. या कारवाय्या प्रगल्भ लोकशाहीचा हिस्सा बनू शकत नाहीत. वर्तमान राज्यकर्ते लोकशाही तारक नाही.ते मारक ठरत आहेत. त्यासाठी राजकारणातील धार्मिकता,भ्रष्टाचार गुन्हेगारी निपटून काढावी लागेल. तेव्हाच राष्ट्रवाद बळकट होईल.तो अस्सल राष्ट्रवाद असेल. ती प्रगल्प लोकशाहीकडे वाटचाल ठरेल.
-भूपेंद्र गणवीर
..................BG..................