नागपूर/ प्रतिनिधी
मेजर हेमंत जकाते पुरस्कृत भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मातृदिन संगीत समारोह ७ सप्टेंबर रोजी धनवटे सभागृहात संपन्न झाला.
श्रावण अमावस्या म्हणजेच " पिठोरी अमावस्या" हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत " मातृ देवो भव" असे म्हणून आईला देवांपेक्षाही वरचे स्थान दिले आहे. आई ही आपली पहिली गुरू आहे. जन्म देणारी,संस्कार करणारी ,पालन पोषण करणारी आई ही सर्वश्रेष्ठ आहेच अशा या मातृ देवतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष हा दिवस संगीत समारोह साजरा करून करीत आहे.या निमित्याने मातांचा सन्मान केला जातो.
मातृदिन संगीत महोत्सवाचे विशेष अतिथी अनेक पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध संगीतकार मा.शैलेश दाणी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला . या वेळी त्यांनी पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वर्षभर होणाऱ्या उत्तमोत्तम उपक्रमाचे कौतुक करत असेच उपक्रम सातत्याने आयोजित करावेत यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या . यावेळी संगीत महोत्सवातील सर्व कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मा.शैलेश दाणी हे नागपुरचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व .अनेक चित्रपटांना त्यांनी सुमधुर संगीत दिले आहे तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या" कापूस कोंड्याची गोष्ट" या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
प्रास्ताविक उज्वला अंधारे यांनी केले तर पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मातेची महती ,आईचे आपल्या जीवनातील स्थान तसेच पद्मगंधा प्रतिष्ठान ही संस्था म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती यांचा वरदहस्त लाभलेली संस्था आहे.मातृ शक्तीचे महत्व विशद करून आपले मनोगत व्यक्त केले.
मातृदिन संगीत महोत्सवाचा शुभारंभ
" स्वतंत्र पाखरे आम्ही विशाल या नभंतरी" या देशभक्तीपर समूह गीताने करण्यात आला.यावेळी डॉ. अंजली पारनंदीवार यांनी " घे तसला अवतार " ,आणि " या डोळ्यांची दोन पाखरे "ही गीते गायली त्यानंतर विद्या बोरकर " लिंब लोण उतरू कशी",आणि कानडी मधील " भाग्यदा लक्ष्मी बारम्मा " ही सुमधुर गीते सादर केली.सानिका रुईकर " मर्म बंधातली ठेव ही",विशाखा मंगदे यांनी " विश्व सारे आपुले हे भाव ठेवा अंतरी " विश्व बंधुत्वाची भावना जागृत करणारे गीत सादर केले .स्वराली संगीत अकादमीच्या नंदिनी सहस्त्रबुध्दे,रेखा साने,निलिमा कुमारन,आणि सोनाली सहस्रबुद्धे यांनी वाद्य वृंदावर " मधुबन में राधिका नाचे रे" हे अतिशय बहारदार गीत सादर करून रसिक प्रेक्षकांना भारावून टाकले.उज्ज्वला अंधारे यांनी " हृदयी जागा तू अनुरागा ",वृंदा जोगळेकर यांनी " हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता,शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी " ही गीते सादर केली.कार्यक्रमाची सांगता सानिका रुईकर आणि विशाखा मंगदे यांच्या " माता सरस्वती शारदा " या भावपूर्ण भैरवीने करण्यात आली .स्वरदा आणि स्वराली या नागपूरमधील प्रथितयश संस्थानी आपला सहभाग या समारोहात दिला. 'जुनं ते सोनं' असं म्हणतात या संगीत महोत्सवात एकापेक्षा एक सुमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मातृदिन सोहळा बहारदार झाला.
या नंतर एकपात्री प्रयोगात डॉ.सुरुची डबीर यांनी ' धरती माता ',ज्योती चौधरी यांनी ' मी पण आई ' आणि प्रभा देऊस्कर यांनी ' संत कान्होपात्रा ' साकारली .उत्तम लेखन आणि उत्तम सादरीकरणाने कार्यक्रम रंगतदार झाला.हा कार्यक्रम पद्मगंधा फेसबुक पेज वर यू ट्यूब लिंक च्या माध्यमातून बघता येईल.
मातृदिन कार्यक्रमाचे संयोजन डॉ.अंजली
पारनंदीवार आणि उज्ज्वला अंधारे यांचे तर निवेदन आणि आभार डॉ.अंजली पारनंदीवार यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संगीता वाईकर,स्वाती मोहरीर आणि वर्षा देशपांडे यांनी सहकार्य केले.
Mother's Day Music Festival by Padmagandha Pratishthan