Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०८, २०२१

‘आयपीओं’चा सुळसुळाट

‘आयपीओं’चा सुळसुळाट



-मंगेश दाढे

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीम असते, यात कुणाचेही दुमत नाही. जोखीम पत्करून पुढे जाण्याचा संकल्प केल्यास यशस्वी गुंतवणूकदार होता येते. यासाठी संयम आणि चांगल्या शेअर्सची निवड करता आली पाहिजे. त्यातच बाजारातील कंपन्यांना भांडवल तयार करण्याची ओढ लागलेली असते. गुंतवणूकदारांकडून त्यांचाच पैसा आपल्यात ओतायचा आणि कमाई करून द्यायची, हा फंडा ‘इनिशियल पब्लिक ऑफर’ म्‍हणजे आयपीओच्या माध्यमातून बऱ्याच कंपन्या अंमलात आणतात. मात्र, खरा प्रश्न हा आहे की, एखादा कंपनीचा ‘आयपीओ’ बाजारात आला आणि त्यात पैसे गुंतविल्यानंतरही काही गुंतवणूकदारांना सहभागी होता येत नाही. याचा अर्थ असा की, बाजारातील ‘आयपीओ’चा लाभ केवळ मोजक्या गुंतवणूकदारांनाच कसा मिळतो? अन्य गुंतवणूकदार कसे वंचित असतात. याकडे सेबीने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

शेअर बाजारात कंपन्‍या पैसा तयार करण्यासाठी उतरतात. यात आयपीओची मदत घेतली जाते. शेअर बाजारात स्‍वत:चा समावेश करून (लिस्‍टेड) शेअरमध्‍ये गुंतवणूकदारांना विकण्‍यासाठी प्रस्‍ताव आणतात. शेअर बाजारात लिस्‍टेड झाल्‍यामुळे कंपनीच्‍या बाबतीत विस्‍तृत माहिती सार्वजनिक होते. पैसे निर्माण करण्यासाठी उतरणाऱ्या कंपन्या सर्वच गुंतवणूकदारांना आयपीओ खरेदीची संधी उपलब्ध करून देतात. यात लाखो गुंतवणूकदारांना पैसे गुंतवावे लागतात. कंपनीने एका शेअर्सची ठरविलेल्या किंमतीनुसार विक्री केली जाते. भारतात लाखो गुंतवणूकदार पैसे गुंतवितात. मात्र, दुर्दैव असे की,मोजक्याच गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये संधी मिळते. बऱ्याच कंपनीचे आयपीओ येतात आणि कुठे अडगळीत पडतात,हे कळतच नाही. आयपीओत नावाजलेल्या कंपन्या पैसे दुप्पट,तिप्पट,चौपट करून देतात. पण, अशा कितीतरी कंपन्यांचे आयपीओ येतात आणि ते आपल्याला कळतही नाही. मोजक्या पण नावाजलेल्या कंपन्यांमध्ये पैसे लावून शेअर्सची रक्कम वाढविता येते. कंपनीची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याचे आकलन गुंतवणूकदाराला आल्यास त्याचे बल्ले-बल्ले निश्चितच होईल.

*आयपीओची गरज काय?*

एखादी लहान कंपनी असून तिचे भांडवल कमी आहे. कंपनीचा विस्तार करण्याचे व्यवस्थापकाने ठरविल्यास व त्यातून इक्विटी वाढवून आपल्या इतर गरजा पूर्ण करण्‍यासाठी बाजारात आयपीओचा प्रस्ताव ठेवला जातोय. कर्ज न घेता आणि पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपन्‍या आयपीओची मदत घेतात.


*किंमत कशी ठरते?

आयपीओ म्हटलं की, गुंतवणूकदारांच्या उड्या पडणारच. आयपीओची किंमत दोन पद्धतीने निश्चित होते. एकतर प्राईस ब्रँड निश्चित करून अर्थात गुंतवणूकदारांकडून अर्ज मागविले जातात. ज्‍यावर कंपनीला सर्वात जास्‍त अर्ज मिळतात. त्‍यावरच कंपनी आपल्‍या शेअरची किंमत निश्चित करते. तर, दुसरा फिक्‍सड प्राइस इश्‍यूने, यामध्‍ये शेअरचे भाव आधीपासूनच निश्चित केलेले असतात. गुंतवणूकदाराला शेअरमध्‍ये गुंतवणूक करायची की नाही, याचा निर्णय घ्‍यावा लागतो.

 *आयपीओ आणि एफपीओमधील फरक*

एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) यामध्‍ये पहिल्‍यांदा सूचीबद्ध कंपन्‍या आपले काही शेअर विकतात. तर आयपीओमध्‍ये कंपन्‍या शेअर बाजारमध्‍ये स्‍वत:ला लिस्‍टेड करून गुंतवणूकदारांना प्रस्‍ताव देतात. 

 *इकडे लक्ष द्या*

आयपीओमध्ये गुंतवणूक करावी की नाही, हे छातीठोकपणे सांगणे जरा कठीणच. एखादी कंपनी भविष्यात कशी विकास करेल,यावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे सर्वच बाबींची शहानिशा करूनच आयपीओमध्ये गुंतवणूक करावी.कंपनीचे उत्पादन कसे आहे, किती मागणी आहे, याची खात्रीशीर माहिती मिळवली पाहिजे.त्यानंतरच आयपीओमध्ये सहभागी व्हायचे किंवा नाही, यावर खल करावा. तसेच कंपनीचे उत्पन्न, उलाढाल किती आहे, कंपनीची संपूर्ण किंमत किती आहे, अशा सर्व बारीकसारीक गोष्टीही तुम्हाला नजरेत ठेवणे गरजेचे आहे.

 *रिलायन्सनंतर एलआयसीची प्रतीक्षा*

रिलायन्सने आयपीओ बाजारात आणला, तेव्हा बऱ्याच गुंतवणूकदारांनी यात सहभाग घेतला. आता बहुचर्चित व बहुप्रतीक्षित आयपीओ एलआयसीचा आहे. भारतात बऱ्याच गुंतवणूकदारांना अशा मोठ्या कंपनीच्या आयपीओपासून वंचित रहावे लागते. याकडे सेबीने खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावे. एलआयसीच्या आयपीओमुळे शेअर बाजाराचा चेहरामोहरा बदलनार आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये ज्याला सहभागी होण्याची संधी मिळेल, तो चांगली कमाई करेल, हे नक्की. इतक्यावरच हा लाभ थांबणार नाही तर एलआयसीच्या आयपीओमुळे अन्य इन्शुरन्स कंपन्यांचे शेअर्सचे शुल्क वधारणार आहेत, याचा अभ्यास गुंतवणूकदारांना करावा लागेल.


-मंगेश दाढे

(उपरोक्त लेखातील मत वैयक्तिक आहेत. गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा)


Investing in the stock market is risky

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.