महिलांनी निःसंकोच सामाजिक कार्यात पुढे यावे.-सरपंच प्रतिभा बोरकर
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.२६ जुलै:-
ग्रामपातळीवर महिलांनी संकुचित विचार करू नये. कुटुंबातील एक सुशिक्षित, संस्कारित महिला कुटुंबाला उज्वल दिशा देऊ शकते. सर्वांगीण विकास करण्याची किमया करू शकते. चार भिंतीच्या बाहेर निघून, विधायक अशा सामाजिक कार्यात महिलांनी निःसंकोच पुढे यावे. असे आवाहन बोंडगावदेवी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा बोरकर यांनी केले आहे.
त्या ग्रामपंचायत बोंडगावदेवीच्या सभागृहात जन शिक्षण संस्था गोंदिया वतीने,कौशल विकास आणि उद्योग मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वच्छता पंधरवडा व वृक्षारोपण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे प्रकल्प अधिकारी विनायक डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे, शिवणकला प्रशिक्षक अर्चना कराडे, आशा शहारे, दुर्गा झोडे, छाया मानकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
प्रत्येक महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच, स्वयंरोजगाराची कास धरावी. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी महिलांनी हातभार लावावे. आपले गाव स्वच्छ व सुंदर राहण्याबरोबरच, गावात वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करावे. असेही सरपंच प्रतिभा बोरकर पुढे म्हणाल्या.. बाजार चौकात जांभूळ, आवळा, करंजी, पेरू या प्रजातीचे वृक्ष लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रिना डोंगरवार यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अजय चपसकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद च्या सूर्यकांता हूकरे, ईशा रामटेके, स्वाती भैसारे,वनिता राऊत यांनी सहकार्य केले.