• सागर भटपल्लीवार यांची बांधकाम विभागाकडे मागणी
• आंदोलनाचा इशारा
राजुरा, दि. ३० जुलै : तेलंगना राज्याला जोडणारा प्रमुख आंतरराज्य मार्गावरील राजुरा ते बामणी, राजुरा - लक्कडकोट, रेल्वे उड्डाणपूल मार्गात अनेक ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे रोज किरकोळ अपघात घडत असुन वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. यामुळं या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
यावेळी सागर म. भटपल्लीवार ( sagar Bhatpalliwar) यांच्या नेतृत्वात आशिष करमरकर, संदीप पारखी, अभिषेक बाजूजवार, उज्वल भटारकर, बंटी मालेकर, पत्रकार श्रीकृष्ण गोरे, संतोष कुंदोजवार, अमित जयपूरकर आदींची उपस्थिती होती. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांच्याकडे देण्यात आले.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येणे शक्य नाही. यामुळे वाहने खड्ड्यात पडत आहेत. या मार्गावरून लोकप्रतिनिधी व शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रोज अवागमण असूनही रस्त्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
राजुरा ते बामणी हा अत्यंत महत्वाचा मार्ग असून यामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मागील काही महिण्याआधी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच मार्गावरील डांबर उखडून मोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे अत्यंत धोकादायक असून खड्ड्यातील गिट्टी रस्त्यावर आल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका बळावला आहे. नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांना पाठीचे व मणक्याचे आजार होत आहे. यामुळे उपविभागातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली असून योग्य वेळात दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिष्टमंडळाकडून देण्यात आला आहे.