मंगेश दाढे/ नागपूर
khabarbat | Nagpur
नागपूर, अकोला, वाशिम, नंदूरबार व धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका 19 जुलै रोजी होणार आहेत. 20 जुलै रोजी मतमोजणी आणि 23 जुलै रोजी निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची घोषणा होईल. राज्य निवडणूक आयोगाने कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्याची अधिसूचना 22 जून रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता राजकीय नेतेमंडळी निवडणुकीच्या रनांगणात उतरणार आहेत. कोरोनामुळे निवडणुकीला दोन महिने स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून उपरोक्त पाच जिल्हा परिषदांमध्ये सुरु असलेला राजकीय आखाडा तूर्त शांत झालेला होता.या पाच जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागांवरील निवडणुका रद्द करून तेथे नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, नागपूर जिल्हा परिषदेतील ५८ पैकी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ जागांवरील निवडणुका रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ पैकी ४ जागा अतिरिक्त ठरल्या होत्या. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांवर फेरनिवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. कोरोना थोडाफार कमी झालेला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत. आम्ही आधीपासूनच कामाला लागलोय. पण, आता खऱ्या अर्थाने प्रचाराला गती येईल, असा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी केला.