वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात
#Chandrapur #covid #hospital #Chandrapur #khabarbat
चंद्रपूर, ता. २२ : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ४२ हजार ३६० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख १६ हजार ९१९ जण निगेटिव्ह निघालेत. उर्वरित २५ हजार ४४१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार ९२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या केवळ ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ६५ रुग्ण गृहविलीगीकरणात, ५ रुग्ण खासगी रुग्णालयात तर मनपाच्या आसरा कोव्हीड रुग्णालय आणि कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण १९ रुग्ण उपचार घेत आहेत.
मागील वर्षी कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच महानगरपालिकेने व्यापक उपाययोजना केल्या. शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी व सैनिकी शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटीजन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर कारवाई, व्यापक लसीकरण मोहीम, यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील कमी होत आहे.
एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4468 इतकी होती. ती २२ जूनपर्यंत ८९ पर्यंत कमी झाली आहे. यातील ६५ रुग्ण गृहविलीगीकरणात, ५ रुग्ण खासगी रुग्नालयात, मनपा आसरा कोव्हीड रुग्णालय आणि कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण १९ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरात एक जूनपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली, हे विशेष. दरम्यान, गत वर्षभरात कोव्हीडमुळे ४२५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील आठवडाभरापासून मृत्यूचा आकडा स्थिर आहे. सध्या कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
- गृह विलगीकरण : 65
- खासगी रुग्णालय : 5
- कोव्हीड केअर सेंटर रुग्ण : 19
- एकूण एक्टिव पॉझिटिव्ह : 89