नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ड्राईव्ह इन लसीकरणाला प्रारंभ
- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन
नागपुर 14 मे 2021
नागपूर महानगरपालिके तर्फे कोविड प्रतिबंधात्मक लसीच्य ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे आज स्थानिक सीताबर्डी येथे ग्लोकल मॉलमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त बी राधाकृष्णन उपस्थित होते. या ड्राईव्ह इन लसीकरणात मॉलच्या पार्किंग एरियामध्ये गाडीतून येणाऱ्या 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत करण्यात येत आहे . याप्रसंगी गडकरी यांनी जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले . सदर लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
या उद्घाटनानंतर गडकरी यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना वर्धाच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस मध्ये 17 हजार रेमडेसिविर इंजेक्शनच्या पहिल्या खेपेचे वितरण हे विदर्भात होणार आहे. आज सुद्धा 25 हजार इंजेक्शनची खेप निघणार आहे. यांचे वितरण महाराष्ट्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सुद्धा होणार असून इंजेक्शनच्या उपलब्धतेमुळे या इंजेक्शनच्या काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे सांगितले.
कोविड मधून जे लोक बरे झाले आहेत त्यातील काहींना 'ब्लॅक फंगस 'चा संसर्ग होऊन डोळ्यांना अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे असे लक्षणे दिसताच त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन गडकरी यांनी केले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना संसर्ग होऊ नये यासाठी नागपूरातील डागा इस्पितळात एक स्पेशल वार्ड तयार करण्यास सुद्धा महानगरपालिका सज्ज असल्याचे गडकरी यांनी सांगितले.