पत्रकारा सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांना फ्रंटलाइन कोरोना वॉरियर घोषित करा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कुटुंबियाला १५ लाखांची मदत द्या
खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
चंद्रपूर : कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वत्र एक वर्ग नेहमी कार्य करीत राहिला. नेहमी संकटकालीन परिस्थिती व सामान्य जनता यातील दुवा म्हणून पत्रकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य, त्यामध्ये महानगर पालिकेतील नगरसेवक, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत येथील सदस्य तसेच गावातील पोलीस पाटील हे करीत आहे. दुसऱ्या लाटेत देखील हा वर्ग मोठ्या प्रमाणात २४ तास सेवा देत असतो. कुटुंब घरी सोडून ते कार्य करीत आहेत. फ्रंटलाइन कोरोना वॉरियर घोषित करून त्यांना कोरोनामुळे मुत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियाला १५ लाखांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
देशात, राज्यात तसेच जिल्ह्यात देखील पत्रकार, स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्य व पोलीस पाटील हे २४ तास आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत देशात जवळपास १६५ पत्रकार मृत्यू पावले आहे. तसेच नगरसेवक व इतर सदस्यांच्या आकडा देखील मोठा आहे.
मोठ्या प्रमाणात शहरी तसेच ग्रामीण भागात देखील आरोग्य यंत्रणासोबत खांद्याला खांदा लावून पत्रकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य, त्यामध्ये महानगर पालिकेतील नगरसेवक, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत येथील सदस्य तसेच गावातील पोलीस पाटील आपले कर्तव्य बजावत आहेत. मोठ्या प्रमाणात विलीगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासोबत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था देखील हि मंडळी करत आहे. त्यासोबतच पत्रकार देखील मोठी भूमिका या कठीण काळात वठवीत आहेत. अशा परिस्थित त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारने घेऊन निर्णय घेत फ्रंटलाइन कोरोना वॉरियर घोषित करून त्यांना लसीकरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.