मनपाने केली १० झोनमध्ये सहा हजार 'सुपर स्प्रेडर्स'ची चाचणी
नागपूर, ता. 17 : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बाज़ारपेठा, बँक, शासकीय आणि खाजगी कार्यालय, दुकाने इत्यादि ठिकाणी 'सुपर स्प्रेडर'ची कोरोना चाचणी करण्यात आली. अशी चाचणी दहाही झोनमध्ये करण्यात येत आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शनिवारी (ता. १५) सहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली.
महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य विभागाला सुपरस्प्रेडर्सची चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, आणि श्री संजय निपाणे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या सहकार्याने डॉ. शुभम मनगटे आणि चमूकडून चाचणी करण्यात आली. या कार्यात ११ मोबाइल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात आला. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यत कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या चमूव्यतिरिक्त आता नवीन १० चमूसुद्धा चाचणीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. नवीन चमूच्या माध्यमातून बालकांची तसेच मधुमेह आज़राने त्रस्त नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे.
मनपाच्या वतीने कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी विशेष शिबीर आयोजित करून चाचणी करण्यात आली. तसेच विविध आजाराने ग्रस्त, सिकलसेल रुग्ण यांचीसुद्धा चाचणी करण्यात येणार आहे. या कार्यात डॉ. संगम मकड़वाड़े, डॉ. पराग ढाके, डॉ. गोपाल समर्थ यांचे सहकार्य मिळत आहे. दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी चाचणीच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था आपापल्या संबंधित झोन मध्ये केलेली आहे. ज्या नागरिकांना कोरोनासदृश लक्षणे आहेत अथवा जे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत, अशा व्यक्तींनी चाचणी करून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.