रुग्णालयांनी बेड्सची माहिती अद्ययावत द्यावी : महापौर
कोरोना नियंत्रण कक्षाला भेट : नागरिकांना होतेय मदत
नागपूर, ता. १७ : नागपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बेड्स उपलब्धतेसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय नियंत्रण कक्षामुळे नागरिकांचे काम सोपे झाले आहे. फक्त रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध बेड्सची माहिती वेळच्या वेळी अद्ययावत केल्यास गरजू रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास मदत होईल, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
रविवारी (ता. १७) त्यांनी मनपा मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षाला भेट देऊन तेथून नागरिकांना मिळत असलेल्या सेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वयंसेवी संस्थेच्या नीरजा पठाणीया उपस्थित होते. त्यांनी महापौरांना संपूर्ण व्यवस्थेची माहिती दिली.
याबद्दल बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, केंद्रीय नियंत्रण कक्ष सुरू करण्याची तयारी मनपाने केलेलीच होती. दरम्यान उच्च न्यायालयाचा आदेश आला. तयारी असल्याने दुसऱ्याच दिवशी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. कुठल्याही रुग्णाला त्यांच्या सोयीनुसार बेड्स मिळणे सोपे झाले आहे. शासनाचा आदेश असतानाही खाजगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स शासकीय दराने उपलब्ध करून देण्याचा नियमाला हरताळ फासण्यात येत होता. मात्र नियंत्रण कक्षामुळे त्याला आला बसला आहे. नियंत्रण कक्षातील कर्मचारी समर्पण भावनेने कार्य करीत आहे. उत्कृष्ट संचलन होत आहे. ज्यांना बेड्सची आवश्यकता आहे, त्यांना ओटीपी दिला जातो. तोच ओटीपी रुग्णालयाला पाठविला जातो. त्या आधारावर रुग्णालयात प्रवेश मिळतो, अशी माहिती त्यांनी दिली.
नागपुरात ९९६ व्हेंटिलेटर बेड्स आहेत. मात्र ऑनलाईन साईटवर २७ उपलब्ध दाखवित आहे. याचा अर्थ स्थिती खराब आहे अथवा रुग्णालयांनी माहिती अपडेट केली नसावी. मनपा प्रशासनाने रुग्णालयांना आकस्मिक भेट देऊन याबाबत शहानिशा करावी, अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.