मनोजकुमार सुर्यवंशी यांची संकल्पना ठरतेय यशस्वी
कार्यालयात न येताof ऑनलाईन अर्ज, ड्रॉपबॉक्स सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
नागपूर, ०७ मे २०२१: नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) या दोन्ही कार्यालयात नागरिकांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आले असून कमीत कमी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित हे दोन्ही कार्यालय सुरू आहेत.
मात्र, नागरिकांना कोणतिही अडचण होऊ नये व कार्यलयाशी संबंधित त्यांची कामे पूर्ण करता यावी यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे व कार्यालयात लावण्यात आलेल्या ड्रॉपबॉक्स सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन 'नासुप्र'चे सभापती तथा 'नामप्रविप्रा'चे महानगर आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केल्यानंतर या संकल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बहुतांश नागरिक ऑनलाईन अर्ज करत आहेत, तर पहिल्यांदाच ड्रॉप बॉक्स सुविधा उपलब्ध करून दिल्याने केवळ एका महिन्यातच १७५ अर्ज ड्रॉप बॉक्सच्या माध्यमातून दोन्ही कार्यलयात प्राप्त झाले आहे. नागरिकांच्या अर्जावर तातडीने कारवाई करत आतापर्यंत ड्रॉप बॉक्समधील १४५ अर्ज निकालीही काढण्यात आले. उर्वरित अर्ज ही लवकरच निकाली काढण्यात येणार आहे.
राज्य शासनातर्फे १५ मे पर्यंत कडक निर्बंध वाढवण्यात आल्याने तेव्हा पर्यंत नागरिकांना नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात येता येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी पुढे ही ऑनलाईन आणि ड्रॉप बॉक्स सुविधेचा वापर करत राहण्याचे आवाहन पुन्हा एकदा मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.