तलाठी व खाजगी इसमास लाच घेताना अटक , लाचलुचपत विभागाची जुन्नर येथे कारवाई
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर मधील बांधकाम साहित्य पुरवठादार याला त्याचा वाहनांवर कारवाई न करण्याकरिता दर महिन्याला 50,000रुपयांची मागणी करणारा महसूल विभागाचा तलाठी आणि खाजगी इसमा विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई करीत जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोयाब शेख रा जुन्नर याने ह्याबाबतची फिर्याद नोंद केली आहे. त्यानुसार सुधाकर रंगराव वावरे रा कल्याण पेठ जुन्नर , रज्जाक रहमान इनामदार रा पणसू़ंबा पेठ जुन्नर ह्यांच्या विरोधात अँटिकरपशन विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील बिले ह्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी सापळा रचून कारवाई केली. जुन्नर मधील बांधकाम साहित्य पुरवठादार शेख ह्याला त्याचा व्यवसायाकरिता चालणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्याकरिता दर महिन्याला 50,000रुपयांची लाचेची मागणी लोकसेवक असलेला वावरे याने केली होती. इनामदार याने ही रक्कम देण्याकरिता शेख ह्याला प्रोत्साहित केले. अँटिकरपशन पथकाच्या विभागाने जुन्नर लगतच्या सोमतवाडी येथील कोविड सेंटर समोर सापळा रचून या दोघांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अँटिकरपशन विभाग पुणे हे करीत आहेत.
दरम्यान कोविड संसर्गाचा काळात सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त असताना जुन्नर महसूल विभागातील तलाठी व त्याचा बरोबरीचा खाजगी इसम ह्यांच्यावर झालेल्या ह्या कारवाई मुळे जुन्नर मध्ये खळबळ उडाली आहे.