आज पासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात 18 वर्षे वयावरील युवक व नागरिकांसाठी लसीकरणाला प्रारंभ
अर्जुनी-मोर तालुक्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र व ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. ११मे:-
युवक वर्गात आतापर्यंत जी उत्सुकता होती ते अठरा वर्षावरील युवक ते 44 वर्षे पर्यंत चे नागरिक यांच्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम अर्जुनी मोरगाव तालुक्यात आज दिनांक 11 मे रोज मंगळवारपासून सुरू होत आहे. तालुक्यातील सहा आरोग्यवर्धिनी केंद्र व त्याअंतर्गत येणारे उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध व अर्जुनी मोरगाव येथे 18 वर्षांवरील युवक व नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.कोविन वेबसाईटवर जाऊन 18 वर्षे वरील युवकांनी व नागरिकांनी एक दिवस आगोदर नोंदणी करून आपले स्थळ व वेळ निश्चित करावी, असे आवाहन तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोनाशी लढतांना लस हेच कवचकुंडल आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे, लस घेतल्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास किंवा शारीरिक इजा होत नाही. त्यामुळे लसी बद्दल कोणीही आपल्या मनात शंका ठेवू नये.दोन्ही लसीचे डोस घेतल्यानंतर नियमित कार्यात कसल्याही अडचणी येत नाही. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता सर्वांनी लस घ्यावी, कारण वाढत्या कोरोना संक्रमनामध्ये लसच आपल्यासाठी जीवन रक्षक कवच आहे. आपल्या सर्व शास्त्रज्ञांनी अतिशय मेहनत आणि अखंड परिश्रम घेऊन ही लस आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे.
सर्व डॉक्टरांनी,शिक्षक, नर्सेस,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ते यांनी तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व त्यांच्याशी संबंधित क्षेत्रातील घटकांनी कोरोना काळात अतिशय प्रशंसनीय कार्य केले आहे. जे आजही त्याच जोमाने सुरु आहे. सर्व 18 वर्षावरील पात्र नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून स्वतःचे लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनाला हद्दपार करण्यात योगदान द्यावे. तसेच आपण सर्वांनी आपल्या घरच्या 18 वर्षावरील सदस्यांना, नातेवाईकांना व मित्र परिवारातील सदस्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन अर्जुनी मोरगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत यांनी केले आहे.