राजुरा विद्युत विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पाच महिन्यांपासून विद्युत मीटर कार्यालयात उपलब्ध नाही
कंत्राटी ठेकेदाराला तीन हजार देऊन मीटर उपलब्ध करा, विद्युत विभागाचा ग्राहकांना सल्ला
राजुरा /प्रतिनिधी
दिनांक:- 4/4/2021
राजुरा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेकडो नगरिक विद्युत मीटरसाठी रीतसर अर्ज करून डिमांड भरलेले आहे, मात्र माहे ऑक्टोंबर २०२० पासून विद्युत विभागात विद्युत मीटर उपलब्ध नसल्याचे उपविभागीय अधिकारी लोहे हे ग्राहकांना सांगत आहे, त्यामुळे ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राजुरा येथील विद्युत अभियंता यांनी सांगितले की जिल्ह्यात मागील पाच महिन्यांपासून शासनाने मीटर उपलब्ध करून दिलेले नाही यामुळे डिमांड भरलेल्या ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देणे अशक्य होत आहे.
विद्युत मीटर प्रायव्हेट ठेकेदाराकडून उपलब्ध करू शकता असा सल्ला तेथील विद्युत अभियंत्यांनी दिला, मात्र कंत्राट ठेकेदाराकडून मिटर घेतल्यास ३०००/-हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. घरगुती मिटरसाठी १७००/-, व्यवसायिक मिटरसाठी २३००/- डिमांड भरून पुन्हा ३०००/- रू कंत्राटदाराला देऊन मीटर विकत घ्यावे ही ग्राहकांची लूट नाही काय? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
कंत्राटी ठेकेदाराकडे मीटर उपलब्ध आहेत मात्र विद्युत विभागाकडे नाही यावरून विद्युत विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
*काही लाईनमन कडूनही ग्राहकांची लुट*
नविन विद्युत मिटर साठि कार्यालयात अर्ज दाखल केल्या नंतर सर्वे म्हणून त्या डि. टि. सी च्या लाईनमन ची सही पाहिजे त्यासाठी ग्राहकाकडून १०००/- ते १५०० /- रुपयाची मागणी लाईनमन करतात, नाहितर सर्वे न देता अर्ज परस्पर गहाळ करतात, तसेच ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचे अर्जावर अजूनही सही केली नाही अशी माहिती सूत्रांकडून आहे.
ग्राहक एक महिना बिल भरले नाही तर त्याचे मीटर कापल्या जातो आता पाच महिन्यांपासून डिमांड भरूनही मीटर नाही मग ग्राहकांनी काय करावे असे मत ग्राहक व्यक्त करीत आहेत. कोरोना चे संकट देशात असल्याने नागरिक आर्थिक संकटात आहेत. अश्या परिस्थितीत अनेक नागरिक काही धंदा करण्याच्या उद्देशाने डिमांड भरून विद्युत मिटरची मागणी केली आहे, मात्र पाच महिन्यापासून विद्युत विभागात मीटर नसल्याने अनेकांना व्यवसाय सुरू करता आले नाही यामुळे प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे डिमांड भरलेले नागरिक बोलत आहेत.
राजुरा येथे उपकार्यकारी अभियंता लोहे हे मागील ६ ते ७ वर्षापासून ते एकाच कार्यालयात कार्यरत आहेत, यावरुन त्यांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे, एवढ्या वर्ष एकच अधिकारी कसा काय? यामुळे लोहे यांची बदली करून नवीन अधिकारी नियुक्त करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत.