नागपूर, दिनांक २८एप्रिल २०२१-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी लावली असली तरी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहून वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरविण्यासाठी अहोरात्र कामावर आहेत.फ्रंट लाइन वर्कर असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या कोरोना पासून बचाव करण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महावितरण च्या सिव्हील लाईन्स विभागात लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.कामठी रोडवरील बँ.राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात आयोजित या शिबिरात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.दिवसभरात सिव्हील लाईन्स विभागातील एकुण ६० कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. महावितरण अधिकारी आणि कर्मचारी हे कोरोना योद्धा असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केले होते. यानुसार नागपूर महानगरपालिकेने लसीकरणाची व्यवस्था करून दिली. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे स्वीय सहायक सचिन कोटांगळे,बालमुकुंद जनबंधू यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके,नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभीयंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळ उपस्थित होते.
शहरातील अन्य ठिकाणी मनपाकडून लस उपलब्ध झाल्यावर याच पध्दतीने कर्मचाऱ्यांचे सामुहिक लसीकरण करण्यात येणार आहे. असे मुख्य अभीयंता दिलीप दोडके यांनी सांगितले.