रिडींगच्या माहितीसाठी महावितरणचा व्हाट्सअँप क्रमांक
नागपूर: दि. २८ एप्रिल २०२१:
कोरोना निर्बंधामुळे सर्वत्र लॉक डाउन असून 'वर्क फ्रॉम होम' आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होण्याची शक्यता आहे.अशा स्थितीत महावितरण कडून रिडींग घेण्यात येत असले तरी ग्राहकांनीही आपले मीटर रिडींग तपासून ते महावितरणकडे पाठविल्यास ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण आणता येइल तसेच अचूक बिलासाठीही या रिडींगचा वापर होईल. मीटर रिडींग घेतांना ग्राहकांना कुठलीही अडचण आल्यास त्याचे निराकरण त्वरित व्हावे यासाठी नागपूर परिमंडलाने ग्राहकांसाठी व्हाट्सअँप क्रमांक जाहीर केला असून त्याचा लाभ घेऊन अचूक वीज बिलासाठी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्टात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' करीत आहे. याशिवाय तापमानाचा पाराही वाढत असून त्यामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशावेळी विजेचा वापर किती होत आहे हे तपासण्यासाठी आणि जर विजेचा वापर खूप वाढत असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ग्राहकांना आपल्या वीज मीटरवर रिडींग पाहण्याची सोय उपलब्ध आहे.तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी महावितरणचे कर्मचारी जीवाची तमा न बाळगता कोरोना नियमांचे पालन करून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांकडून कंटेनमेंट भाग वगळता इतर सर्व ठिकाणी वीज मीटरचे रिडींग घेणे सुरूच आहे. परंतु तरीही कोरोना काळात अचूक बिलासाठी रिडींग बाबत एसएमएस मिळाल्यानंतर ग्राहकांनीही वीज मीटरचे रिडींग पाठविल्यास ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक वीज बिल मिळण्यास आणखी मोठी मदत मिळणार आहे.
वीज मीटर चे रिडींग पाठविताना ग्राहकांना अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी नागपूर परिमंडलाने नागपूर महानगर पालिकेच्या हद्दीसह बुटीबोरी, हिंगणा तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी ७८७५०१००५२ हा व्हॉटस् अँप क्रमांक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला असून नागपूर जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण भागासाठी ७८७५७६६६९१ हा क्रमांक महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाईल वरून या क्रमांकावर मेसेज पाठविल्यास महावितरणच्या वतीने ग्राहकांना मीटर रिडींग कसे पाठवावे या बाबतची माहिती व व्हिडिओ शेअर करण्यात येणार आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे व जून महिन्यात मीटर रीडिंग घेणे महावितरणला शक्य न झाल्याने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशनानुसार वीज ग्राहकांना त्यापूर्वीच्या हिवाळ्याच्या तीन महिन्यातील कमी वीज वापर असलेल्या काळातील वीज वापर गृहीत धरून सरासरी वीजबिले देण्यात आली होती. याकाळात ज्या ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतः वीज मीटर रिडींग पाठविले होते.अशा ग्राहकांना वीज वापरानुसार वीज बिल देण्यात आली होती. त्यामुळे कोरोना काळात प्रत्यक्ष वीज वापरानुसार वीज बिल मिळण्यासाठी ग्राहकांनी मीटरवरील रिडिंगचे निरीक्षण करावे. तसेच स्वतः मीटर रिडींग पाठवावे व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.