कोविड 19 नियमांचे सर्वांनी पालन करावे- ठाणेदार जनार्दन हेगडकर
मुंगली जवळ भरला बाजार, 29 दुकानदारांवर गुन्हे दाखल
संजीव बडोले प्रतिनिधी
नवेगावबांध दि..2 एप्रिल:-
काल दि.1 एप्रिल रोज गुरुवारला येथील आठवडी बाजार बंद असल्याने तसेच कडक लॉक डाऊन व कडकडीत बंद असल्याने काही भाजीपाला विक्रेत्यांनी, दुकानदारांनी नजीकच्या मुंगली गावाजवळ रस्त्यावरच बाजार थाटला होता. त्यामुळे तिथे परिसरातील ग्राहकांनी धाव घेतली होती. त्यामुळे तिथे गर्दी झाली होती. याची माहिती मिळताच ठाणेदार जनार्दन हेगडकर आपल्या सहकाऱ्यांसह बाजारात दाखल झाले. या ठिकाणी कुठल्याही कोरोना प्रतिबंधक नियमांचे दुकानदार व ग्राहक पालन करीत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. तेव्हा त्यांनी २९ दुकानदारांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून तपासात घेतले. तसेच मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे व सॅनिटायझर चा वापर करणे, याचे या कोरोना काळात कशी गरज आहे. हे तिथे उपस्थितीत असलेल्या दुकानदार व नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या कोविड १९ कोरोनाव्हायरस या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्व व्यापारी बंधूनी मास्क चा वापर करावा, आपल्या दुकान/किराणा दुकान/फळांचे दुकान/हॉटेल/पानाचीटपरी/इतर आस्थापना इत्यादी मध्ये येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर ची व्यवस्था करावी. येणाऱ्या ग्राहकास मास्क परिधान करून येण्याची विनंती करावी.असे पोलीस स्टेशन नवेगावबांध हद्दीतील सर्व व्यापारी बंधू आणि भगिनींना नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी एक बाब विचारात घ्यावी की, आपला,आपल्या कुटुंबीयांचा,मित्रांचा, आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांचा व त्यांचे कुटुंबीयांचा जीव वाचला, तरच गाव वाचेल आणि गाव वाचले तरच आपले व्यवसाय वाचतील. त्यामुळे सर्वांनी भारत सरकार,महाराष्ट्र सरकार यांनी आपल्या जीविताचे रक्षण करण्यासाठी निर्गमित केलेल्या कोविड १९ च्या नियमांचे पालन करावे. कोणालाही कोविड १९ कोरोनाव्हायरस या रोगाचा संसर्ग होणार नाही. याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. स्वतःची व इतरांची काळजी घेऊन,प्रशासनास सहकार्य करावे.असे कळकळीचे आवाहन ठाणेदार जनार्दन हेगडकर सहायक पोलिस निरीक्षक,नवेगावबांध पोलीस ठाणे यांनी केले आहे.
पोलीसगाडी बाजारात दाखल होताच, दुकानदार व ग्राहकांची घाबरगुंडी उडाली. दुकानदार व ग्राहकही घाईघाईने आपले मास्क खिशातून काढून तोंडावर लावायला लागले. ग्राहकीत मग्न असणारे दुकानदार पोलिस जवळ येताच भांबावून गेले.
मुंगली जवळ भरलेल्या बाजारात २९ दुकानदारांवर कोरोना प्रतिबंधक नियमानुसार ,विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून, पोलीस तपासात घेतले आहे.- ठाणेदार जनार्दन हेगडकर, पोलीस ठाणे नवेगावबांध