स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ऐकण्यासाठी मराठी अधिकारी द्या
चंद्रपूर : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील सास्ती येथील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवती आशा तुळशीराम घटे हिने वेकोलि अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलय्या यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला बडतर्फ करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. येथील मूळ ओबीसी समाजाच्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्या आहे. परंतु न्याय मागण्याकरिता वेकोलि अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर परप्रातीय वेकोलि अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून घेत नाही. त्यांना या प्रकल्पग्रस्तांशी काही देणे घेणे नसते. त्यामुळे आजवर अनेक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला दिसून येत नाही. येथील प्रकल्पग्रस्त अनेक पिढ्या ह्या भूमिहीन झालेला आहे. अनेक पिढ्या ह्या उघड्यावर पडलेल्या आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि अधिकारी म्हणून मूळचे मराठी अधिकारी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
सास्ती येथील मृतक आशा तुळशीराम घटे हिच्या वडिलांची शेती वेकोली मार्फत संपादित करण्यात आली होती. स्व. आशा घटे हि वेकोलीमार्फत लाभार्थी असल्यामुळे नोकरी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता वेकोलिचे योजना अधिकारी जी. पुलय्या यांनी बोलावल्यानुसार धोपटला येथील वेकोलि कार्यालयात गेली होती. यावेळी पुलय्या यांनी आशा घटे हिला अपमानास्पद वागणूक दिली व त्यामुळे तिने सास्ती येथील घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून मृतक आशा तुळशीराम घटे हिला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.